छ.संभाजीनगर – कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांना ‘ध्यास’या पहिल्या मराठी काव्यसंग्रहासाठी विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल विष्णुपंत ताम्हणे विद्यालय चिखली, पुणे यांच्या तर्फे काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ध्यास हा काव्यसंग्रह २०२४ या वर्षी प्रकाशित झाला आहे. दि.०८ जुन ( रविवार) रोजी एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे येथे वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव-२०२५ भव्य खुले कवीसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ सुशिल सातपुते यांना काव्यगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ.श्रीपाल सबनीस ( संमेलनाध्यक्ष, ८९ वे अ.भा.म.सा.सं , पिंपरी चिंचवड, पुणे) , मा श्री.बबन पोतदार ( ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ) यांच्या हस्ते तसेच प्रा. डॉ.शैलेंद्र भणगे ( कवी संमेलनाध्यक्ष) मा.श्री. वि.दा. पिंगळे( कार्यवाहक, म.सा.प, पुणे ), प्रा.हनमंत धालगडे, मा श्री लक्ष्मण शिंदे, मा.श्री.नानाभाऊ माळी, यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला. पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये भव्य खुले कवीसंमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी मा.श्री डॉ. शैलेंद्र भणगे तर उद्घाटक म्हणून कवियत्री प्रतिमा काळे होत्या. माणदेशी कवीवर्य मा. डॉ . लक्ष्मण हेंबाडे, कवयीत्री मेहमुदा शेख, कवी नानाभाऊ माळी, मा.श्री.लक्ष्मण शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक ग्रामीण कवी श्री चंद्रकांत जोगदंड यांनी केले तर या रंगतदार काव्यमैफीलीचे बहारदार सुत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,’मराठी कवी आणि साहित्यिक आजही प्रेम, आलिंगन, चुंबन, शेती, माती, नातीगोती या विषयांत गुंतलेले दिसतात. मात्र, आजच्या साहित्याला वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध आणि जागतिक प्रश्न यांसारख्या विषयांवर भाष्य करण्याची नितांत गरज आहे. साहित्यिकाने सत्य, विवेक आणि न्याय यांचा धर्म स्वीकारावा, सांस्कृतिक लोकशाही बळकट झाल्यासच राजकीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. ही सांस्कृतिक एकात्मता राजकीय नेत्यांनाही शिकवावी लागेल. जाती-पातीच्या भिंती ओलांडून निधर्मी, संविधानाधिष्ठित संस्कृती निर्माण झाली पाहिजे. आजच्या काळात नव्या हिटलरसारख्या प्रवृत्तींना थांबवणे आवश्यक आहे. विश्वात शांतता नांदावी, यासाठी साहित्यिकांनी सजगपणे पुढाकार घेतला पाहिजे. कवीने महाराष्ट्रच नव्हे, तर देशाचा नकाशा ओलांडून विश्वात्मकता अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्मिक विचार व्यक्त केले.
डॉ सुशिल सातपुते यांना यापूर्वी साहित्य क्षेत्रातील बंधुता प्रकाशयात्री , बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कविसंमेलनातुन कविता सादरीकरण केले आहे. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रह, दिवाळी अंक, साप्ताहिक, वर्तमानपत्रातुन कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २०२४ या वर्षी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी समाज प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचे आयोजन तसेच सुत्रसंचालन केले आहे . तसेच अनेक साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी वरून शैक्षणिक, साहित्यीक कार्यक्रमाचे प्रसारण देखील झाले आहे. डॉ.सुशिल सातपुते सध्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कृषीविद्या विभागात, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन ग्रामीण कवी श्री.चंद्रकांत जोगदंड यांनी केले होते. प्रा. डॉ सुशिल सातपुते यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.
