झाराप-जांभळी येथे महिंद्रा EV चा भीषण अपघात
अचानक वाढलेल्या वेगामुळे गाडी थेट गॅरेजमध्ये घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली
कुडाळ :
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra EV या नवीन इलेक्ट्रिक कारचा वेग अचानक वाढल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गाडीला आजच अधिकृत नंबर मिळाला होता. ओरोस येथून घरी परतत असताना झाराप येथे आल्यानंतर अचानक गाडीचा वेग प्रचंड वाढला. वाहनाचा स्पीड तब्बल १०७ वर गेल्याने चालकाला गाडीवरील नियंत्रण मिळवता आले नाही.
भरधाव वेगातील ही इलेक्ट्रिक कार थेट रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये घुसली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की महामार्गालगतच्या घरांपर्यंत तो ऐकू गेला. जोरदार ब्रेकचा आवाज आणि धडकेमुळे परिसर हादरून गेला. आवाज ऐकताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले.
या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या अनेक वाहनांना मागून जोरदार धडक बसली. काही वाहने अक्षरशः रस्त्यावर फेकली गेली.
अपघातानंतर काही काळ महामार्ग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Mahindra EV या इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
