*आयुष्य हा एक प्रवास! – रमेश इनामदार*
*’माझी प्रवास गाथा’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न*
पिंपरी
‘आयुष्य हा एक प्रवास असून तो समरसून केल्यास मानवी जीवनाचे सार्थक होते!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक रमेश इनामदार यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक शहाजी कांबळे लिखित ‘माझी प्रवास गाथा’ या सहाव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमेश इनामदार बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे उपाध्यक्ष गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, लेखक शहाजी कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
रमेश इनामदार पुढे म्हणाले की, ‘गोडसे भटजी यांच्या ‘माझा प्रवास’ या प्रवासवर्णनाने मराठी साहित्यात या नव्या साहित्यप्रकाराची समृद्ध परंपरा निर्माण झाली. त्यात वास्तवाला प्रतिभाशक्तीची जोड देऊन शहाजी कांबळे यांनी केलेले प्रवासवर्णनपर लेखन त्यांच्या सूक्ष्म अवलोकन अन् निरीक्षण कौशल्याचे प्रत्यय देणारे आहे. विशेषत: आपला देश आणि परदेश यांतील तपशीलवार सांस्कृतिक तफावत नमूद करताना त्यांच्या मनाची संवेदनशीलता पानोपानी जाणवते!’ अरविंद जोशी यांनी, ‘कांबळे यांची प्रवास गाथा वाचल्यानंतर वाचक नक्कीच प्रवासाला उद्युक्त होतील!’ असा विश्वास व्यक्त केला. सुधीर वैद्य यांनी अनावृत पत्रवाचनाच्या माध्यमातून कांबळे यांच्या वैविध्यपूर्ण लेखनाची आस्वादक समीक्षा केली; तर मुग्धा पुजारी यांनी, ‘प्रवासवर्णन म्हणजे मानवी संस्कृतीचे जिवंत चित्रण असते!’ असे मत मांडले. मंगेश उंबराणी यांनी मैत्रीदिनानिमित्त शहाजी कांबळे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लेखक शहाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून, ‘तीन कथासंग्रह आणि दोन ललित लेखसंग्रह यांच्या प्रकाशनानंतर आज मैत्रीदिनानिमित्त पत्नी, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने माझे सहावे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रकाशित होत आहे. मनात कोणतेही पूर्वग्रह न बाळगता सर्वधर्मसमभाव या जाणिवेतून जगात जे जे सुंदर, उदात्त अन् अद्भुत आहे ते ते मी मन:पूर्वक डोळे भरून पाहिले; आणि मी अनुभवलेला आनंद वाचकांही मिळावा म्हणून ते शब्दांकित केले आहे!’ अशी भावना व्यक्त केली.
अथर्वशीर्षपठण, दीपप्रज्वलन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नीलिमा कांबळे, कांबळे मित्रपरिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड कार्यकारिणी यांनी संयोजनात सहकार्य केले. शामकांत खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
