निस्वार्थ समाजसेवेचा सन्मान; डॉ. दिनेश नागवेकर ‘भंडारी समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित
विद्यार्थी वसतिगृहाच्या उभारणीत विनामूल्य योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते गौरव
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘भंडारी समाजरत्न’ पुरस्कार यंदा डॉ. दिनेश नागवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला.
डॉ. नागवेकर हे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे संस्थापक सेक्रेटरी असून, मंडळाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीचा नकाशा तयार करण्यापासून ते संपूर्ण बांधकामाच्या पर्यवेक्षणापर्यंतचे काम त्यांनी विनामूल्य केले. त्यांच्या या निस्वार्थ, समर्पित आणि उल्लेखनीय समाजसेवेची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास भंडारी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष हेमंत कळंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर आणि जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देविदास आडारकर, संजय पिळणकर, उदय पारिपत्ये, नंदकिशोर कोंडये, महेश धुरी, हनुमंत पेडणेकर, ज्ञानदीप राऊळ, विकी केरकर, सुनिता पेडणेकर, देव्या सुर्याजी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. दिनेश नागवेकर यांना ‘भंडारी समाजरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
