एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत खुशी धर्णे तालुक्यात प्रथम
३०० पैकी २७४ गुण मिळवत साटेली-भेडशी केंद्र शाळेच्या विद्यार्थिनीचे उज्ज्वल यश
दोडामार्ग
श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा, साटेली-भेडशी येथील विद्यार्थिनी कु. खुशी सत्यवान धर्णे हिने एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ३०० पैकी २७४ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खुशीच्या या उज्ज्वल यशाबद्दल भाजप तालुका उपाध्यक्ष गणपत डिंगणेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, साटेली-भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर, भाजप कार्यकर्ते कलैया हिरेमठ, हसिना शेख आदी मान्यवरांच्या हस्ते तिचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे वडील सत्यवान धर्णे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी खुशीच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक करत भविष्यातही ती शैक्षणिक क्षेत्रात असेच उल्लेखनीय यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. तिच्या यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
