You are currently viewing नगराध्यक्ष चषक बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे वर्चस्व; बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता

नगराध्यक्ष चषक बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे वर्चस्व; बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता

नगराध्यक्ष चषक बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे वर्चस्व; बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता

१८ पैकी ९ पारितोषिकांवर मुक्ताई ॲकेडमीची मोहोर; राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकरचे विजेतेपद, विविध गटांत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आयोजित नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने खुल्या गटात विजेतेपद पटकावत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १८ पैकी तब्बल ९ पारितोषिकांवर कब्जा केला.
स्पर्धा मुख्य गट, १६ वर्षांखालील आणि ११ वर्षांखालील अशा तीन गटांत खेळविण्यात आली. मुक्ताई ॲकेडमीच्या ६ वर्षांवरील २८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. लहान खेळाडूंनीही आपल्या बुद्धीची चमक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू, अवघ्या ६ वर्षांच्या दिव्यांका नार्वेकर हिने ११ वर्षांखालील मुलींच्या गटात पाच फेऱ्यांत तीन विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. तसेच ७ वर्षीय आकाश वाटवे याने सहा फेऱ्यांत चार विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
खुल्या गटात बाळकृष्ण पेडणेकर प्रथम आला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात हर्ष राऊळ याने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात गार्गी सावंत प्रथम, चारुल जाधव द्वितीय आणि सलोनी चव्हाण तृतीय येत संपूर्ण गटावर मुक्ताई ॲकेडमीने वर्चस्व गाजवले.
११ वर्षांखालील मुलांच्या गटात विघ्नेश अंबापूरकर तृतीय आला. मुलींच्या गटात मोहीशा जाधव हिने प्रथम, तर दिव्यांका नार्वेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले असून, सर्व स्तरांतून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा