बिळवस भोगलेवाडीत बंद घराला भीषण आग; घरासह पाच वाहने जळून खाक
भोगले कुटुंबाचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने कुटुंबीय मुंबईत असल्याने जीवितहानी टळली
मालवण
तालुक्यातील बिळवस भोगलेवाडी येथे गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनील सोमा भोगले यांच्या बंद घराला भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच आवारात उभी असलेली क्वालिस कार, रिक्षा, स्कूटरसह पाच वाहने आगीत भस्मसात झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईत असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालवण-बागायत मार्गावरील बिळवस भोगलेवाडी येथे सुनील भोगले हे पत्नी व मुलांसह कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. गुरुवारी पहाटे अचानक घराला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच घराच्या आवारात उभी असलेली पाच वाहनेही आगीत पूर्णपणे भस्मसात झाली.
आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही तातडीने दाखल झाला. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ पोहोचण्याचा संभाव्य धोका टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
