दिवाळीत फोंडावासीयांना अनोखी भेट; फोंडा नं. १ शाळेसाठी १० लाखांचा निधी मंजूर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी सभापती सुजाता हळदीवे (राणे) यांच्या प्रयत्नांना यश; शाळेच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी निधी
फोंडाघाट :
दिवाळीच्या सणानिमित्त फोंडावासीयांना अनोखी भेट मिळाली असून, फोंडाघाट येथील सर्वात जुन्या फोंडा नं. १ जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि माजी सभापती सुजाता हळदीवे (राणे) यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे.
फोंडाघाट परिसरातील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या या जुन्या शाळेच्या दुरुस्तीमुळे शाळेच्या विकासाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, याच शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेकांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे.
मराठी माध्यमाच्या शाळांच्या विकासासाठी मंत्री महोदयांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी सभापती सुजाता हळदीवे यांचेही त्यांनी आभार मानले.
