You are currently viewing बेंगळुरूचा प्रवास संपला

बेंगळुरूचा प्रवास संपला

*क्वालिफायर-२ मध्ये राजस्थान-हैदराबाद भिडणार*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर काढले. अशाप्रकारे बेंगळुरूचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ८ गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे राजस्थानचा संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला. आता २४ मे रोजी दुसऱ्या बाद फेरीत त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी अंतिम फेरीमध्ये खेळेल. या सामन्यापूर्वी बेंगळुरूने सलग सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आता सलग १७ व्या हंगामात बेंगळुरू संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आपले खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयाचे नेतृत्व करणाऱ्या यश दयालने तीन षटकांत ३७ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

 

बेंगळुरूच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ज्या प्रकारे मिठी मारली, त्यावरून असे मानले जात आहे की कार्तिकचाही हा आयपीएलमधील शेवटचा सामना होता. कार्तिकने यापूर्वी सीएसकेला पराभूत केल्यानंतर सांगितले होते की, सीएसकेविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा असेल असे त्याला वाटत होते. अशा स्थितीत कार्तिकची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.

 

तत्पूर्वी, रविचंद्रन अश्विन, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या शानदार गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये अपेक्षेइतकी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आरसीबीला आठ विकेट्सवर एकूण १७२ धावांवर रोखले. आवेश खानने ४४ धावांत ३ बळी घेतले, तर अश्विनने १९ धावांत २ आणि बोल्टने १६ धावांत एक बळी घेतला. स्वकेंद्रित विराट कोहलीने २४ चेंडूत ३३ तर रजत पाटीदारने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. महिपाल लोमरोरने अखेर १७ चेंडूत ३२ धावा करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

 

नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने क्वालिफायर-१ मध्ये कोलकाताविरुद्ध जी चूक केली तीच चूक सॅमसनने केली नाही. संजूने आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्याच षटकात विराट कोहलीने संदीपवर चौकार मारून चौकाराची सुरुवात केली. डू प्लेसिसनेही याच षटकात डावातील पहिला षटकार मारला. मात्र, दोघांनीही बोल्टला सावधपणे खेळवले. त्याने दोन षटकात केवळ ५ धावा दिल्या. विराटने अावेशच्या पहिल्याच चेंडूला हुक करून पहिला षटकार ठोकला. या षटकात डुप्लेसिसने दोन चौकार मारून एकूण १७ धावा केल्या. बोल्टला आक्रमणात ठेवण्याचा संजूचा निर्णय बरोबर ठरला. डुप्लेसिसने मारलेला पुल मिडविकेटवर पॉवेलने सुंदर झेलमध्ये परिवर्तीत केला. डुप्लेसिसने १४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. दोघांनी २८ चेंडूत ३७ धावा जोडल्या. बोल्टने पहिल्या तीन षटकात केवळ ६ धावा देऊन एक विकेट घेतली.

 

आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहली पॉवरप्लेमध्ये बाद झाला नाही. विराटने सहाव्या षटकात संदीपवर दोन चौकार मारून आरसीबीला ५० धावांवर नेले. चौकारांसह विराटने आयपीएलमधील ८००० धावाही पूर्ण केल्या. आरसीबीने पॉवरप्लेमध्ये एका विकेटसाठी ५० धावा केल्या होत्या, ज्यामध्ये विराटने १९ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. या सामन्याला विराट विरुद्ध चहल म्हटले जात होते. मोक्याव्या क्षणी संजूने चहलला आक्रमणात आणले आणि त्याने विराटला मिडविकेट सीमारेषेवर त्याचा झेल देण्यास भाग पाडले. विराटने २४ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. आणि पुन्हा एकदा स्वतःसाठी खेळत असल्याची मोहोर उठवली. राष्ट्रीय संघ असो वा एखाद्या क्लबचा संघ तो केवळ वैयक्तिक विक्रम करण्यासाठी खेळत असतो. त्याच्यासाठी देश किवा कोणताही संघ कधीच महत्वाचा नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

 

अश्विन आणि चहलने पॉवरप्लेनंतर पुढील तीन षटकांत धावांचा वेग रोखला. या काळात केवळ १३ धावा झाल्या आणि विराट तंबूत परतला. दहाव्या षटकात कॅमेरून ग्रीनने चहलला एक षटकार आणि एक चौकार मारून आक्रमण परतवून लावले. यादरम्यान अश्विनच्या चेंडूवर जुरेलने पाटीदारचा सोपा झेल सोडला. पाटीदार ६ धावांवर खेळत होता आणि आरसीबीची धावसंख्या ७८ धावांवर होती. १३व्या षटकात अश्विनने सलग दोन चेंडूंवर कॅमेरून ग्रीन (२१) आणि मॅक्सवेल (०) यांच्या रूपाने आरसीबीला दुहेरी झटका दिला. मॅक्सवेल आयपीएलमध्ये १८व्यांदा शून्यावर बाद झाला. पाटीदारलाही मोठी खेळी करता आली नाही. आवेशने त्याला ३४ धावांवर बाद केले. आवेशने कार्तिकला (११) बाद करत लोमररसोबतची ३२ धावांची भागीदारी संपवली. यानंतर आवेशच्या गोलंदाजीवर ३२ चेंडूत १७ धावा करून लोमररही बाद झाला.

 

१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर कॅडमोर यांनी ४६ धावांची सलामी दिली. लोकी फर्ग्युसनने कॅडमोरला त्रिफळाचीत केले. त्याला २० धावा करता आल्या. यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. यशस्वी अर्धशतकापूर्वी कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. त्याला ३० चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा करता आल्या.

 

मोठा फटका खेळण्याच्या नादात सॅमसन बाद झाला. त्याला १३ चेंडूत १७ धावा करता आल्या. कोहलीच्या एका शानदार चेंडूफेकीमुळे ध्रुव जुरेल आठ धावा करून धावबाद झाला. मात्र, दुसऱ्या टोकाकडून रियान परागने धावा सुरूच ठेवल्या. त्याने शिमरॉन हेटमायरसोबत ४५ धावांची भागीदारी केली आणि बंगळुरूच्या हातून सामना हिसकावून घेतला. १८व्या षटकात परागला सिराजने त्रिफळाचीत बाद केले. तो २६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाला. त्याच षटकात सिराजने शिमरॉन हेटमायरला डुप्लेसिसकरवी झेलबाद केले. त्याला १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करता आल्या.

 

सामन्याने पुन्हा एकदा वळण घेतल्यासारखे वाटत होते, पण रोव्हमन पॉवेलने आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावांची नाबाद खेळी केली आणि राजस्थानला विजयापर्यंत नेले. पॉवेलने १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला. बेंगळुरूकडून सिराजने दोन गडी बाद केले. तर फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

या विजयासह राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ३१ सामने जिंकणारा तो राजस्थानचा कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने महान शेन वॉर्नची बरोबरी केली. वॉर्नच्या नेतृत्वाखालीही आरआरने ३१ सामने जिंकले होते. यानंतर राहुल द्रविड १८ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि स्टीव्ह स्मिथ १५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

 

त्याचवेळी आरसीबीचा प्लेऑफमधील हा १०वा पराभव आहे. संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. बेंगळुरूने आतापर्यंत १७ हंगामात प्लेऑफमध्ये १६ सामने खेळले आहेत आणि १० सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे. या बाबतीत चेन्नई आणि दिल्ली प्रत्येकी नऊ पराभवांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये चेन्नईने २६ तर दिल्लीने ११ सामने खेळले आहेत. प्लेऑफ म्हणजे क्वालिफायर-१, एलिमिनेटर, क्वालिफायर-२ आणि अंतिम सामना.

 

राजस्थानच्या विजयात रियान परागने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २६ चेंडूंत २ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. पराग या संपूर्ण मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने खूप चांगल्या धावा केल्या आहेत. त्याने १७व्या सत्रात आतापर्यंत ५६७ धावा केल्या आहेत. राजस्थानसाठी आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पराग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जोस बटलर पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने ८६३ धावा केल्या होत्या. तर, यशस्वी जैस्वालने २०२३ मध्ये ६२५ धावा केल्या होत्या आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

यासह पराग आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचा एक नियोजित सामना बाकी आहे आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर दोन. अशा परिस्थितीत तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडू शकतो. यशस्वीने २०२३ मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून ६२५ धावा केल्या होत्या. रायन या कामगिरीपासून ५८ धावा दूर आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू शॉन मार्श दुसऱ्या स्थानावर आहे. २००८ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने ६१६ धावा केल्या होत्या. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे त्या विशिष्ट वर्ष किंवा वेळेपर्यंत ज्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही असा खेळाडू असतो.

 

रियान पराग आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या किंवा एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ऋषभ पंतच्या नावावर आयपीएलच्या एका मोसमात चौथ्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना ५७९ धावा केल्या. परागच्या नावावर ५६७ धावा आहेत. या हंगामात परागने राजस्थानसाठी फक्त चौथ्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

 

या संपूर्ण सामन्यात बेंगळुरू किंवा राजस्थान दोघांनीही अर्धशतक झळकावले नाही. या सामन्यात एकूण ३४६ धावा झाल्या. कोणाचेही अर्धशतक नसलेल्या सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या प्रकरणात, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात खेळला गेलेला हंगामातील पहिला सामना अव्वल स्थानावर आहे. त्या सामन्यात एकूण ३४९ धावा झाल्या, परंतु दोन्ही संघातील एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा