You are currently viewing माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे

माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे

माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे

सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ ; 1 कोटी 60 लाखाचे उद्दिष्ट 

* सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

* वीर पत्नी, वीर माता व वीर पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर

देशाच्या सीमांचे संरक्षण सैनिकांकडून अहोरात्र केले जाते. अशा सैनिकांच्या कुटुंबियांच्या विविध विभागाकडे असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.

         जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष स्थानावरुन अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार सुनीता नेर्लेकर, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार, सुभेदार मेजर बंडू कात्रे, अधिकारी कर्मचारी, वीर माता, वीर पत्नी व वीर पिता व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे पुढे म्हणाले की, शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल व प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून माजी सैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत 41 माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना शेती योग्य जमिनीचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. तर उर्वरित सर्व शेतजमीन वाटपाची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सुचित केले.

         आपल्या देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सहज सुलभ व्हावे यासाठी तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन केले जाते. आपल्या जिल्ह्यात मागील वर्षी शंभर टक्के निधी संकलन झाले असून यावर्षीही ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

          प्रारंभी अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विजय दिनानिमित्त शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी श्री. शिंदे यांच्या हस्ते सशस्त्र ध्वज दिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. ध्वजदिन 2021 निधी संकलनात उत्कृष्टरित्या संकलन केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. तसेच सन 2021 निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्मृतीचिन्ह देण्यात आलेले असून ते अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी स्वीकारले.

       यावेळी सैनिक, माजी सैनिक त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना काळात माजी सैनिकांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अशा सैनिकांचा तसेच वीर माता, वीर पत्नी व वीर पिता यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. मुगनाळे यांच्याकडून आठ वर्षापासून पंधरा हजाराचा निधी

            इचलकरंजी येथील श्री. विनोद सिताराम मुगनाळे मागील आठ वर्षापासून त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पंधरा हजार रुपयांचा निधी ध्वज दिन निधी संकलनात प्रतिवर्षी देत आहेत. ते सैनिक व त्यांच्या कुटुंबीय प्रती आपली कर्तव्य पूर्ण करत आहेत. त्यांच्या या कृतीचा आदर्श जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी श्री. मुगनाळे व त्यांच्या कुटुंबियांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पवार यांनी केले. मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलन 100 टक्के झालेले असून यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला 1 कोटी 60 लाख 79 हजाराचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या निधी संकलनात सर्व शासकीय विभागांनी व सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व माजी सैनिकांचे कुटुंब यांचे आभार चंद्रशेखर पागे यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + ten =