You are currently viewing जागतिक पातळीवर सध्या भारताचे स्थान….

जागतिक पातळीवर सध्या भारताचे स्थान….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमतीताई पवार लिखित अप्रतिम लेख

मी इ. ११वीत धुळ्याला हायस्कूल मध्ये शिकत होते. १९६५ / ६६ चा काळ होता. कळत काहीच नव्हते फारसे, प्रवाह पतिता
सारखे प्रवाहात ढकलले जात होतो.बैल गाड्या सायकलींचा
सुळसुळाट होता. बसेस होत्या, सी टी बसेसही होत्या. पण
माफक प्रमाणात. ठराविक वेळीच . रिक्षा तर नव्हत्याच !
मोठा जिकिरीचा काळ होता. स्ट्यॅंडवर जाणे, पेटी गादी सामान घेऊन. ते हमाल वर टपावर सामान चढवणार , दोरीने
बांधणार, खचाखच गर्दी..अरूंद चिंचोळे रस्ते, राम राम …!
आली ना कल्पना प्रवासाची? रस्त्यात समोरून बैलगाडी आली
की एस टी बाजूला कलती थांबणार मग बैलगाडी हळू हळू
बाजूने जाणार .. !हीच परिस्थिती जवळपास १९६९ला आम्ही
नाशिकला आलो तो पर्यंत थोड्याफार फरकाने होती. जागेसाठी मारामारी…? राम राम ! विचारूच नका? आमच्या
बिऱ्हाडाचे सामान पोहचविण्यासाठी माझ्या सासऱ्यांना किती
यातायात करावी लागली हे आठवून तर मनस्ताप तर होतोच
पण किती कठीण काळात आपण जगत होतो नि त्या काळी
तेही सुख मानत होतो हे आठवून आज आश्चर्यही वाटते.
सुख हे शेवटी परिस्थिती सापेक्ष असते हेच खरे आहे नाही का?

आता विचार करते, हे सारे बिनबोभाट करत होतो आपण!
राग कंटाळा त्रास उबग चिडचिड संताप कधीच आला नाही.
का? हो, हेच खूप आहे, बस गावात येते, वा रे वा ! किती
प्रगती नि कित्ती मजा, अशी भावना होती. पण आज ?
बाप रे? एस टी ने जायचा मी विचार ही करू शकत नाही.
अशक्यच! गेट मध्येच अलिशान २/३ गाड्या उभ्या असतांना?
कशी बस ने जाईन मी? दारातूनच गेट मधून गाडीत पाय टाकते मी आता! पोटातले पाणी हलत नाही २/३ न शे मैल
प्रवास करून येते मी! घरात गेल्यावर प्रवासाहून आलो हे ही
आठवत नाही, कारण थकवा नाही, ए सी ची हवा थकवाच
येऊ देत नाही ना?

मग ही प्रगतीच नाही का? एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंखेच्या,
अज्ञान दारिद्र्याने पिडिलेल्या देशात ह्या सुविधा ही प्रगती
वाटावी हीच परिस्थिती होती ना? आपला देश इतका प्रचंड
मोठा आहे , व आज ही आम्ही अज्ञानातून बाहेर पडलो नाही
खरेच सांगा याला फक्त आणि फक्त सरकारे जबाबदार
आहेत का? अहो, दहा माणसांचे कुटुंब चालवतांना आम्ही
मेटाकुटीला येतो तेव्हा आसेतू हिमाचल विविध रूढी व
परंपरांनी ग्रासलेल्या या देशाला प्रगती पथावर नेणे सोपी
का गोष्ट आहे? म्हणून आज आम्ही खूप आघाडीवर असलो
तरी असंख्य समस्यांनी आमची पाठ सोडलेली नाही, याला
कारण आम्ही स्वत:ही आहोतच ना? लोकसंख्या हा आपल्या
देशापुढील फार मोठा प्रश्न आजही तोंडवासून उभा आहे याला
जबाबदार सरकार आहे काय? अजिबात नाही. अगदी युद्ध
पातळीवर सरकारने प्रयत्न केले की नाही? केले?

सरकारे समजा नीट कामे करत नाहीत, ठीक आहे, मग हे
सरकार नावाचे यंत्र आहे का? आपणच निवडून देतो ना
प्रतिनिधी? आपलीच माणसे ना ती? ते भ्रष्टाचार करतात
कामे करत नाहीत याला जबाबदार कोण? आपणच!
का निवडून देतो आम्ही अशी माणसे जी देशाला रसातळाला
नेतात? का आम्ही त्यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवत
नाही? का आम्हाला ठिकठिकाणी लांच देऊन कामे करून
घ्यावी लागतात? का आम्ही…… घालून त्यांना त्यांची जागा
दाखवण्याऐवजी त्यांच्या पुढे पुढे करतो? आम्हाला ही घराणेशाहीच का हवी असते का?

म्हणजे जगाच्या तुलनेत जर आज आपण मागे आहोत असे
वाटत असेल तर त्याला जबाबदार कोण? अहो आपणंच !
लक्षात ठेवा, आपण सारेच भ्रष्ट आहोत व भ्रष्टाचाराला
खतपाणी घालणारे आहोत. आपली मेंटॅलिटीच वाईट आहे.
मग आपली प्रगती होणार कशी? त्यात आणखी राजकारणाचा धुमाकूळ ? मग काय? आनंदी आनंदच आहे
सगळा? म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहित असतांना आपण करंट्यां सारखे निष्क्रिय बसून असतांना
व स्वत:च्या स्वार्थाच्या तुंबड्या भरतांना जर आपल्याला
लाज शरम उरली नसेल तर इतरांकडे बोट दाखवण्याचा
आपल्याला काय अधिकार आहे? म्हणून स्वत: पासूनच
सुरूवात करण्याची गरज आहे मंडळी! मला इथे राजकारणा
विषयी अजिबात बोलायचे नाही.

युरोपियन देश प्रगती पथावर आहेत कारण किमान राष्ट्रनिष्ठा
व शिस्त त्यांच्यात आहे? आपल्याला तर…? कसलेच सोयर
सुतक नाही मंडळी..! जरा प्रत्येक जण स्वत:ला तपासून पहा!
आपल्या दृष्टीत समोरचाच वाईट असतो, आपण कधीच नाही. लोकसंख्या वाढते हो, हो पण, आपण कुठे त्यात असतो.समोरचा दारूड्या असतो पण आपण मात्र उच्च वर्गात
मोडतो व रोज फक्त दोन पेग घेऊन झोपतो. आहे की नाही गंमत? मंडळी, म्हणूनच कधी कधी हुकुमशाहीतच प्रगती होते
म्हणतात ते खरे आहे. आपल्या समोर जर्मनी रशिया चिन
यांची उदा. आहेत. पण आपल्याला तर स्वैर वागायला व
मनमानी करायला फक्त लोकशाही हवी! देशाच्या प्रगतीचे
आम्हाला काही घेणे नाही, हे आमचे देशप्रेम आहे !

 

आम्ही फक्त वाचाळ आणि कृतीशून्य आहोत.आपल्या स्वत:च्या कुटूंबापलीकडे आपले जग नाही. शेजारी आग लागली तरी आपल्याला फरक पडत नाही, हं ! आग लागली
का? बरं झालं, अशी आपली मेंटॅलिटी आहे, कशी प्रगती
होणार हो आपली? मंडळी सगळ्या गोष्टी सरकारवर सोपवायच्या नसतात तर देशाचा एक जबाबदार घटक
म्हणून आपली किमान कर्तव्ये असतात ती केली तरच
देश पुढे जातो? आपल्याला तर आपल्या सात पिढ्यांची
सोय कशी होईल याचीच रात्रंदिवस चिंता असते? देश?
कशाशी खातात हो ? अशी आमची परिस्थिती आहे. कसे
होणार हो आमचे कल्याण ? कसा जाणार देश पुढे?
जगात भ्रष्टाचार नाही असा माझा अजिबात दावा नाही.
पण त्या लोकांजवळ किमान देशनिष्ठा आहे जी आपल्यात
अजिबात नाही.

देश पुढे न्यायला टिळक सावरकर गोखले चिपळूणकर
आमटे कलाम बोस निर्माण व्हायला हवेत ?आपल्या सारख्या
भ्रष्ट प्रजेतून ते कसे निर्माण होणार ? याचाच आपण सध्या
विचार करू या..
नाही तर झाली ती प्रगती खूप आहे अशा बढाया मारण्यात
समाधान मानूयात ? हो ना …?

थांबते.. धन्यवाद!

आणि हो, ही मते फक्त नि फक्त माझीच आहेत .

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २३ ॲागष्ट २०२२
वेळ : रात्री ११ :३९

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − five =