You are currently viewing जलशक्ती अभियान 2022 : विभागांनी मेच्या पहिल्या आठवड्यात आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जलशक्ती अभियान 2022 : विभागांनी मेच्या पहिल्या आठवड्यात आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

जून 2021 तसेच 22 मार्च 2022 च्या शासन निर्णया नुसार जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक विभागाने जल संधारणाच्या अनुषंगाने आपला आराखडा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.

                जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबवण्याच्या अनुषंगाने आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता हर्षल यादव आदी उपस्थित होते.

                जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री यांच्या हस्ते 22 मार्च 2021 रोजी जलशक्ती अभियान कॅच द रेन हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर 29 मार्च 2022 रोजी राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियानाचा लोकार्पण सोहळा झाला. हे अभियान 29 मार्च ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे.

                जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार आढावा घेतला. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने या अभियानांतर्गत जलसंधारणाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपला सहभाग नोंदवावा. तसेच आराखडा सादर करून कार्यवाही करावी. जलशक्ती अभियानाच्या पोर्टलवर प्रत्येक विभागाने नोंदणी करावी. त्याचबरोबर माहिती आणि छायाचित्रे अपलोड करावी. सर्व जलाशयांचे जिओ टॅगिंग करावे. नगरपालिका, ग्रामपंचायत यांनीही स्वतंत्र आराखडे सादर करावेत. कृषी, वन, जलसंपदा इतर विभागानेही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा. नेहरू युवा केंद्र, एनसीसी, एनएसएस यांच्या सहभागाने याबाबत जल चळवळीची जनजागृती करावी.

                बैठकीला जिल्हा प्रशासन अधिकारी अवधुत तावडे, उपविभागीय जल संधारण अधिकारी एम.एन.चोडणकर, एल.एन. डुबल, पी.एल. जोईल, नेहरु युवा केंद्राचे विल्सन फर्नांडिस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा