You are currently viewing माझी कविता चिमणी आणि तिचे आईशी साम्य

माझी कविता चिमणी आणि तिचे आईशी साम्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित कविता “चिमणी”चे स्वतः केलेले रसग्रहण*

 

माझी कविता

 *चिमणी* 

आणि तिचे आईशी साम्य

 

गोष्ट २०१९ ची असेल मी धुळे येथील कन्या छात्रालयात कवी संमेलनात सहभागी होतो. कवी संमेलनात आई ह्या विषयावरच कविता सादर करण्यात यावी अशी अट होती. सर्वांच्या आईवर लिहीलेल्या कविता सादर होत होत्या. माझा नंबर आला आणि मी विचार केला सर्वचजण आई वर कविता सादर करीत आहे तर आपण चिमणी वर लिहिलेली कविता सादर करू कारण चिमणी पण तर तिच्या पिल्लांची आईच असते ना?

 

तसे म्हटले तर एक चिमणी तिच्या पिल्लांची आई आणि एक मानवाची आई यात साम्यच असते याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. माझ्या कवितेत चिमणी आणि आई यांच्यात किती साम्य आहे हे मला कविता लिहिताना जाणवले.

संमेलन आयोजकांनी आक्षेप घेतला म्हणाले हे काय कविता आईवरच म्हणायची होती आणि तुम्ही हे काय चिवचिव लाऊन धरले. पण त्यांना हे समजले नाही की चिमणी पण आईच असते. आई आणि चिमणी च्या जगण्यात जीवनात किती साम्य आहे. फक्त बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे.

 

कवितेच्या पहिल्या कडव्यात मी लिहिले. ….

 

*तू चिमणी*

*तुझी चिवचिव*

*इवला इवलासा गं*

*आहे तुझा जीव*

 

तद्वतच आईचे ही असेच असते

आपला जीव मुठीत धरून ती दिवसभर या ना त्या कारणाने बडबडत असते

 

*इवले इवले पंख तुझे*

*इवली इवली चोच*

*निर्मळ मनं तुझे*

*देह निर्मळ तोच*

 

आईचेही असेच असते

तिचे विश्व तिचा संसार असतो, तो संसार ती आपले निर्मळ मन आणि त्याच निर्मळ देहाने चालवित असते.

 

*आकाशी उडते*

*फांदीवर बसते*

*इकडून तिकडे*

*लपंडाव खेळते*

 

आईचाही तिच्या संसारात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इकडून तिकडे सारखा लपंडाव चालू असतो

 

*शेतातील कणसातून*

*दाणे रोज टिपते*

*एक एक दाणा*

*तू पिल्लांना भरवते*

 

आई याहून वेगळे काय करते हो?

सकाळ संध्याकाळ आपल्या लेकरांच्या

खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी राबत असते ना.

 

*चार काड्या वेचते*

*खोपा घरटे बांधते*

*तू छोट्या पिल्लांचा*

*सांभाळ करते*

 

आई चा दिवसही असाच घराची साफसफाई करण्यात लेकरंबाळं सांभाळण्यात निघून जातो.

 

*भुर्रकन उडते*

*खालीवर करते*

*दाणा पाणी शोधण्या*

*नभी घिरट्या घालते*

 

आई तर नेहमीच राशन पाणी भाजीपाला साठी बाजारहाट करायला जाते

 

*स्वच्छंदी विहार*

*पंखा मधे जोर*

*सोबतीला चिमणा*

*नाही कसला घोर*

 

नवरा सोबतीला असल्यावर तिला कसले भय आणि कुणाची भिती ती शरीरात बळ आणून आपल्या संसारात स्वच्छंद नांदत असते.

 

*तू चिमणी*

*तुझी चिवचिव*

*मंजूळ तुझी गं*

*चिवचिव चिवचिव….*

 

शेवटी चिमणी पण आईच असते आणि आई पण एका चिमणी सारखीच असते चिमणीची चिवचिव

आणि आईची

दिवसभराची बडबडही मंजुळ गोडच असते.

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा