You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि. ग. सातपुते (विगसा) एक सालस अष्टपैलू व्यक्तिमत्व

ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि. ग. सातपुते (विगसा) एक सालस अष्टपैलू व्यक्तिमत्व

✒️लेखिका : डॉ. शुभदा खटावकर (मुंबई)

 

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे !शतदा प्रेम करावे!

या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे

या जन्मावर याजगण्यावर शतदा प्रेम

करावे !!

*कविवर्य मंगेश पाडगांवकर* यांच्या या ओळी आपल्या जीवनात सार्थ करणाऱ्या *श्री. विगसा* यांना लेखाच्या आरंभीच आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभकामना !!!

वि.ग.सातपुते म्हणजे विलास सातपुते यांचा आणि माझा अगदी बालपणापासून परिचय आहे .त्यांच्या आत्याचे यजमान हे माझे मामा !त्यामुळे आमचं बहिणी-भावंडांचं नातं माझ्या माहेरी म्हणजे त्यांच्या आत्याच्या सासरी कलेढोणला ते सुट्टीत वारंवार येत असत. कलेढोण खेडेगाव हेअत्यंत निसर्गरम्य व शांत होते ,त्यामुळे त्यांना ते खूप आवडले व प्रत्येक सुट्टी त्यांनी कलेढोणला मस्त , मजेत घालवली. त्याकाळी लोकांजवळ दिडक्या नव्हत्या पण खूप प्रेम असल्यामुळे माणसांमध्ये अत्यंत जिव्हाळा होता. माणसे एकमेकांना धरून होती. कोणाकडे पै-पाहुणा आला की , तो आपलाच पाहुणा होत असे. त्यामुळे माणसाचे स्वागत सर्वत्र होत असे. आप -परभाव औषधालाही नव्हता. या पार्श्वभूमीवर आम्ही लहानपणी अत्यंत मौज -मजेत काळ घालवला. बालपणाचा खरा आनंद लुटला .एकत्र येण्याचा आनंद लुटला. खूप खेळणं -खाणं , गप्पा मस्ती यामध्ये आमचा वेळ मस्त मजेत जात असे.

पोहणे, वनभोजन, भरपूर आंबे खाणं, ही सारी धमाल आम्ही अनुभवली. कलेढोण हे गाव जरी खेडं असलं तरी आत्याचा प्रेमळ स्वभाव, आम्ही सर्वजण, खेळीमेळीचे वातावरण आणि एकूणच प्रदूषणमुक्त गावातली शांतता आणि -निसर्ग हे विलास सातपुत्यांना खूप आवडत असे . म्हणूनच त्यांची प्रत्येक सुट्टी कलेढोणच्या आनंदी वातावरणात मजेत गेली.

माझे वडील डॉक्टर जयराम दिगंबर भंडारे, डॉक्टर शिवाजीराव भोसले तसेच राजारामबापू इनामदार , हणमंतराव साळुंखे , देवबा पाटील अशी अनेक मंडळी आणि श्री.विलास सातपुते यांचे वडील व काका हे जिवलग मित्र होते आणि त्यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. *त्यामुळे आम्हा दोघांनाही वाचस्पती प्राचार्य कै.शिवाजीराव भोसले यांचा बराच सहवास लाभला.*

काळ कोणासाठी थांबत नाही. नंतर माझे लग्न झाले आणि त्यामुळे मी परगावी गेले, म्हणून विलास सातपुते आणि आमच्या कमी गाठीभेटी पडूं लागल्या. *पण योगायोगाने 2020 साली अचानक वि.ग. सातपुते यांची आमच्या डोंबिवलीच्या दिलासा विरंगुळा या ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे, उत्स्फूर्त*

*दोन तासांची प्रकट मुलाखत घेण्याची सुवर्णसंधी मला लाभली.* त्यांची ही मुलाखत अप्रतिम झाली. मुलाखतीतून त्यांच्या स्वभावाचे, सद्गुणांचे आणि कर्तृत्वाचे अनेक पैलू उलगडले. अनेक प्रकारची दर्जेदार माहिती मिळाली. ती मुलाखत युट्युब वर गेल्याने ,अनेक रसिक साहित्यिक, चाहत्यांपर्यंत पोहोचली व तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांची मुलाखत म्हणजे त्यांच्या 65 वर्षांच्या प्रदीर्घ जीवनाचा एक सुंदर चित्रपट आमच्यापुढे साकार झाला. सर्व श्रोते त्यांच्या मुलाखतीवर खूप खूप भारावून गेले. त्यानंतर त्यांच्या मुलाखतीवर आलेले अभिप्राय अत्यंत अविस्मरणीय होते. मलाही कृतार्थतेचा अनुभव आला. मी माझ्या लग्नापूर्वी पाहिलेले विलास सातपुते आणि आजचे साहित्य, कला निर्मितीच्या , चित्रकारीच्या क्षेत्रांत, कवितेच्या क्षेत्रांत अतिशय उंच शिखरावर पोहोचलेले विगसा पाहूंन मन अत्यंत भरून आलं.

त्यांचीही उत्तुंग भरारी सर्वांना सुखावून गेली. त्यांच्या या उज्वला यशाचा आनंद व अभिमान वाटला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी अत्यंत प्रभावीपणे व प्रामाणिकपणे व्रत म्हणून सांभाळल्यामुळे त्यांना त्यांत घवघवीत यश प्राप्त झाले. *त्यांच्या पद्मजा प्रिंटर्स व पब्लिशर्स या संस्थेतर्फे* त्यांनी आजपर्यंत ११५५ पुस्तकांची छपाई केली आहे व छपाईचा एक उच्चांक सादर केला आहे. ते म्हणतात या छपाई आणि प्रकाशनाने माझ्यात असलेल्या लेखन बीजाचे रूपांतर एका लेखन वटवृक्षात केले आहे, त्यामुळेच या प्रेरणेने त्यांनी स्वतःची 38 पुस्तके लिहिली व ती प्रकाशित केली आहेत. अशा तऱ्हेने साहित्य क्षेत्रातील त्यांनी आपले दिग्गज स्थान प्रस्थापित केले आहे.

ते विद्यमान असून आज एवढ्या उच्च पदावर पोहोचूनही ते अत्यंत विनम्र आहेत त्याचे कारण त्यांची त्यांच्या आई , वडिलांवर असलेली आगाध श्रद्धा हे आहे.

त्यांच्या आई १९४२ साली एस. एस. सी. उत्तीर्ण झालेली सुविद्य स्त्री होती. तिचे संस्कृत , मराठी , हिंदी व इंग्लिश भाषेवर प्रभुत्व होते .या वारशाचा विगसांना खूपच उपयोग झाला. ते आपल्या आईवडिलांना आणि पुस्तकांना *पहिले विद्यापीठ मानतात* .

आई -वडीलांवर त्यांची असलेली श्रद्धा, ही त्यांच्या आजवरच्या यशाचं गमक आहे. अशा सुविद्य आईचा तसेच वडिलांचा त्यांना अत्यंत प्रदीर्घ सहवास लाभला. आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचं त्यांनी चीज केलं आणि आपल्या आचरणात आणूंन, समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला. वडिलोपार्जित व्यवसायात रमणारे, असे हे विगसा , आज त्यांच्या साहित्यिक , सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील आगळा असा खास कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यामुळे आज त्यांचा हा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कुटुंबाचे , मित्रांचे त्यांच्यावर असलेले प्रेम या कार्यक्रमाच्या रूपांतून समाजापुढे प्रकट होत आहे.

माझा लहान भाऊ डॉ. गजानन, हा विगसांचा जिवलग मित्र होता.

अनेक सहृदयी आठवणींचे घर माझ्या मनात आहे. अशा समृद्ध व्यक्तीमत्वा वर भगवंताची कृपा सदैव राहो ही प्रार्थना. !!

एवढी पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर त्यांना थोडा अहंभाव झाला ,पण त्याचवेळी चिपळूणच्या एका टेंडरच्या लाॅस मुळे त्यांचा विवेक जागा झाला. हे नुकसान त्यांच्या कल्पनेबाहेरचं होतं वडिलही सोबत होते .त्यामुळे सर्वांनी निर्णय घेतला की, आपण पावसला जाऊंया ,सर्वजण पावसला गेले .त्यांना रात्रभर झोप आली नाही.खूप उद्विग्नता आली होती, पण पहाटे त्यांना अचानक शब्द सुचू लागले आणि *आत्मरंग* नावाची पहिली कविता जन्माला आली. त्या काव्यसंग्रहाच्या पुस्तकामुळे त्यांचे ज्येष्ठ कवयित्री स्व. शांताबाईंचे स्नेह संबंध दृढ झाले. त्यांना कविता ऐकवताना शांताबाई कधी कधी काही दुरुस्ती सांगत त्यामुळे त्या रचनेवर श्रेष्ठ संस्कार होत असत. त्यांच्या कवितेला अत्यंत गोंडस रूप प्राप्त झालेलं आहे. एकदा ते शांताबाईना, “प्रिये आठवण तुझी येते” ही कविता वाचून दाखवत होते. दुसरं कडवं म्हणायच्या आधी शांताबाई म्हणाल्या “प्रिये” ऐवजी “सखये” शब्द वापर. दोन्ही शब्द चार मात्रांचे असले तरी सखये शब्दांमध्ये जो गोडवा आहे तो प्रिये मधे

नाही. या एका छोट्याशा बदलाने कविता खूप उंचीवर जाऊन पोहोचली. श्री विलास आडकरांनी पण त्यांच्या कवितेचं खूप कौतुक केलं आहे. अशा त-हेने ज्येष्ठ -श्रेष्ठ साहित्यिकांच्या परीस स्पर्शाने त्यांच्या शब्दांचे सोने झाले. त्यांना सतत निर्मळ ,उत्तम लोकांचा सहवास लाभला. ते संतांची चरित्रे लिहीत होतेच पण ते चित्रकार

कसे झाले, हा मोठा गमतीचा किस्सा आहे. ते लहानपणी जिथे खेळायला जात कोटेश्वर ग्राउंड शेजारी गोवर्धन लकेरी नावाचे चित्रकार सुंदर चित्रे काढत असे .जुन्या चित्रपटांतील नटांची चित्रे काढण्याचा त्याला छंद होता आणि हा संस्कार त्यांच्यावर झाला. त्यांची आई २८ वर्षे पंढरीची पायी वारी करीत होती. एकदा तिच्या पायाला भरपूर चिरा झाल्या होत्या, म्हणूंन त्यांनी तिला गाडीने जाण्याचा सल्ला दिला पण ती हट्टी असल्यामुळे तिने पायी जाण्याचा संकल्प केला . आश्चर्याची गोष्ट म्हणजे आई वारी करूंन परत आल्यानंतर पाय कसे आहेत, हे पाहण्यासाठी त्यांनी आईचे पाय बघितले तर *साक्षात् विठ्ठलाच्या कृपेने तिचे पाय अत्यंत मऊ झाल्याचा दृष्टांत त्यांना झाला आणि ही विठ्ठलाची कृपाच आहे असे त्यांना वाटले* पण त्यानी आईला प्रश्न विचारला ,तुला विठ्ठल भेटला का? विठ्ठला ऐवजी कळसाचं दर्शन घ्यावं लागलं असं तिनं सांगितलं आणि म्हणून ते म्हणाले तुला आता विश्वरुपी विठ्ठल काढून देतो आणि त्यानी विठ्ठलाचे सुंदर चित्र काढले ते सर्वांनाच आवडले आणि अशा तऱ्हेने

त्यांचा , विश्वरूपी विठ्ठल सर्वत्र गाजला. कै. बिंदु माधव जोशी आणि डॉक्टर कै.बाबा मोडक यांनी जेव्हा तो विठ्ठल पाहिला ,तेव्हा ते खुश तर झालेत पण त्यांनी प्रश्न विचारला की, विठ्ठल काढलास विठ्ठलाची लेकरं कुठं आहेत? त्यांना काही बोध झाला नाही की, विठ्ठलाची लेकरं म्हणजे काय? तेव्हा त्या दोघांनी समजावून सांगितलं विठ्ठलाची लेकरं म्हणजे संत !!एवढं सांगून ते थांबले नाहीत तर त्यांनी शंभर संतांची चित्रे त्यांना दिली आणि आताही पण काढ म्हणून संदेश दिला, आणि अशा तऱ्हेने त्यांच्यातला चित्रकार अत्यंत जागृत झाला आणि पुढे आता 70 चित्रे काढून तयार आहेत अजून पुढची चित्रे पूर्ण करूंन ,त्याना 160 चित्रे पूर्ण करायची आहेत त्यासाठी ही त्यांना ईश्वर भरपूर आयुरारोग्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

 

त्यांना सह्या घेण्याचा छंद होता ,नर्गिस, इंदिरा गांधी, हेलन या सर्वांच्या सह्या घेतल्या. एकदा मनमोहन नातूंची पण सही त्यांनी मागितली तेव्हा नातूंनी प्रश्न विचारला, सही कशासाठी? त्यांनी सही तर दिलीच पण चारोळी ही लिहून दिली. त्यांत त्यांनी मेसेज दिला होता

 

” *उसे असावे गरुड पिसांचे*’ *पिसेअसावे ज्ञानेशाचे”*

हा जो संदेश होता ते म्हणतात याचा अर्थ लागायला मला पन्नास वर्षे लागली.

 

अनेक मंडळी आपल्या हृदय -कुपीत त्यांनी जपलेली आहेत. अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला आहे.

कविवर्य अत्रे 1963 ला सातारला साहित्य संमेलनासाठी आले होते. बॅरिस्टर न.वी .गाडगीळ अध्यक्ष होते. शाहीर अमर शेखर हे त्यात होते. योगायोगाने तीन दिवस ,तीन रात्री अत्रे यांचा सहवास लाभला. अत्र्याची सगळी व्यवस्था पहाण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि स्व. अत्रे यांनी तुझे नाव काय?असे विचारल्यानंतर त्यानी आपलं पूर्ण नाव सांगितल्यानंतर ते म्हणाले आजपासून मी तुला *विगसा* असेच म्हणत जाईन .मोठ नांव कशाला? आणि संपूर्ण संमेलनभर ते त्यांना विगसा याच नावाने संबोधत राहिले. म्हणजे विगसा ही पदवी त्यांना अत्र्यांनी दिलेली आहे .हे त्यांचं मोठं भाग्य आहे.

सातारची पवित्र माती, कृष्णाबाईचं पवित्र जल आणि डोंगर द-यांचा परिसर यांत घालवलेलं बालपण, हे सर्व त्यांच्या जीवनात दृष्टीने अत्यंत अविस्मरणीय आहे. बराच काळ ते सज्जनगडावर श्रीधर स्वामींच्या सानिध्यात राहिले आहेत. त्यांचाही कृपाशीर्वाद मिळूंन त्यांचे जीवन धन्य झाले आहे .अनेक गडांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. मंदिरांना भेटी दिल्या आहेत .अशा अनेक उज्ज्वल आठवणी त्यांच्या अंतःकरणात आजही जगत्या राहिल्या आहेत.

इथलेही संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. रावबा माळ्याच्या परिवर्तनाने त्यांना सज्जनगडचा जिवंत साक्षात्कार झाला आहे

 

मराठीच्या प्रेमाचा संस्कार तर आईकडून त्यांना लाभला होताच शिवाय उपजतही त्यांच्यात मराठीचे प्रेम होते . शाळेत एक वर्षभर एक कविता शिकवणारे प्रा. दा. सी. देसाई नावाच्या हाडाच्या शिक्षकांचे त्यांना आशीर्वाद लाभले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचे योगदान अत्यंत नावाजण्यासारखे आहे. साहित्य क्षेत्र, कालिदास प्रतिष्ठान, चित्रकार म्हणून त्यांची प्रसिद्धी होती, एकदा गोवालिया टँक मुंबई येथे सभेमध्ये त्यांना संतांचे फोटो पाहूंन सप्तर्षिची माहिती आहे का?असा प्रश्न विचारला त्यानंतर त्यानी सप्तर्षिची माहिती मिळवली आणि ते फोटो काढून त्यांना दिले अशा तऱ्हेने साहित्य क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा प्रवास चालू आहे. साहित्य क्षेत्रामध्ये व महाकवी कालिदास प्रतिष्ठान मध्ये डॉक्टर द. भी. कुलकर्णी ,आनंद यादव , न.म. जोशी , वि.भा. देशपांडे , म.श्री. दीक्षित असे मान्यवर त्यांना भेटले आणि अशा तऱ्हेने चित्रकार, साहित्यिक, कवी, प्रकाशक आणि अध्यात्माचे उत्तम अभ्यासक अशा अनेक उपाधीनी, त्यांचे आयुष्य संपन्न झाले आहे. आता 75 वर्षे पूर्ण होऊंन, त्यांच्या आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, त्या मंगलप्रसंगी आपण मंगल कामना चिंतूया आणि या पुढच्याही आयुष्यासाठी भरपूर दीर्घ -आयुरारोग्य लाभावं आणि भगवंतांने त्यांच्याकडून सर्व प्रकारची सेवा पूर्ण करूंन घ्यावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूंया ! पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया!!

*डॉ. शुभदा खटावकर*( मुंबई )

९००४६६८०६९

प्रतिक्रिया व्यक्त करा