You are currently viewing मन पाखरू….

मन पाखरू….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन पाखरू….*

 

मन पाखरू मन गोखरू

मन क्षणात उडे खळ्यात…

 

मन वारा वारा वारा

कसा क्षणात चढतो पारा

मन पसारा पसारा पसारा

मन कचरा जणू डोळ्यात…

 

मन दुथडी वाहते नदी

याला बांधता येईना कधी

मन क्षणात क्षणात उदधी

काठावरती लाटा जोरात…

 

मन ठणक ठणक कधी

मन सुखाची दु:खाची यादी

मन वावटळ मन वांधी

मन चिवट नाही हारत…

 

नाही मनाचा लागत ठाव

मन साधूसंत मन डाव

कसे वर्णावे सांगा हो राव

मन मावेना पहा विश्वात…

 

मन दाणा दाणा जवसाचा

मन हिवाळा ऊन पावसाचा

नका भरवसा देऊ हो याचा

मन बसते स्वत:ला खात…

 

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा