कुडाळ तालुक्यातील लाभार्थ्यांना तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन; प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेचा समावेश
कुडाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेसाठी ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा ४४ हजार रुपये, तर शहरी भागासाठी ५९ हजार रुपये आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू मोफत देण्यात येतो.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत विधवा निराधार, दिव्यांग निराधार व वृद्ध निराधार कुटुंबांतील दोनपेक्षा जास्त सदस्य असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा २० किलो तांदूळ व १५ किलो गहू मोफत दिला जातो.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच अंत्योदय अन्न योजनेसाठी संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, ग्रामसभेचा ठराव आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तहसील कार्यालय, कुडाळ येथे तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
