विविध शासकीय कार्यालयांतील कंत्राटी पदांसाठी बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक व कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून दरपत्रकासह प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. संबंधित संस्थांनी आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव दिनांक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त (अ.का.) जमीर बा. करीम यांनी केले आहे.
या कामांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी येथील सहाय्यक अभियंता, श्रेणी-1, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. 1 या कार्यालयासाठी शिपाई दोन व बंगला चौकीदार अशी प्रत्येकी एक पदे, एकूण तीन कर्मचारी 12 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुक्रमे 3 लाख 38 हजार 496 रुपये व 1 लाख 80 हजार 720 रुपये असा अंदाजित खर्च आहे.
कुडाळ येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. 1 या कार्यालयासाठी चालक व शिपाई अशी प्रत्येकी एक पदे, तसेच मैलमजूर दोन पदे, अशा एकूण चार कर्मचाऱ्यांची 12 महिन्यांच्या कालावधीसाठी आवश्यकता आहे. त्यासाठी चालक पदासाठी 2 लाख 28 हजार रुपये, शिपाई पदासाठी 1 लाख 80 हजार रुपये आणि मैलमजूर पदांसाठी 3 लाख 60 हजार रुपये अंदाजित खर्च आहे. संबंधित अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे सफाई कामगारांची दोन पदे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार असून, त्यासाठी 3 लाख 73 हजार 208 रुपये अंदाजित खर्च आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्तन अभियंता, सिंधुदुर्ग पत्तन विभाग, कुडाळ या कार्यालयांतर्गत पत्तन अभियंता कार्यालयासाठी वाहन चालकाचे एक पद 12 महिन्यांसाठी असून, त्यासाठी 1 लाख 80 हजार 720 रुपये खर्च अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग पत्तन उपविभाग, वेंगुर्ला येथेही वाहन चालकाचे एक पद 12 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी 1 लाख 80 हजार 720 रुपये अंदाजित खर्च आहे. या सर्व कंत्राटी कामांचा एकूण अंदाजित खर्च 20 लाख 21 हजार 864 रुपये आहे.
प्रस्ताव सादर करणारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेकडे संबंधित काम करण्याची पात्रता व पूर्वानुभव असावा. दहा लाख रुपयांपर्यंतची कामे मिळविण्यासाठी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. संस्थेचे खाते सहकारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत असावे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे नियमित वार्षिक लेखापरीक्षण झालेले असावे. सन 2025-26 च्या लेखापरीक्षण अहवालाची प्रत प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे.
संस्थेच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात आलेले असावे तसेच ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. निष्क्रिय सदस्यांची नावे कमी करून त्यांच्या जागी नवीन सदस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व प्रमाणपत्रे जोडावीत. संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडणेही आवश्यक आहे. संस्था अवसायनात निघालेली नसावी.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी दिनांक 28 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार विहित पद्धतीने दरपत्रक तयार करून बंद लखोट्यात प्रस्ताव सादर करावेत. प्रस्ताव दिनांक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
