पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 371 पात्र शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पूर्वी हिस्सा भरून आधार प्रमाणीकरण करावे
सिंधुदुर्ग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 371 पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी https://flrs.maharashtra.gov.in या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची रक्कम संबंधित बँक शाखेत भरून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा तसेच सर्व राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीतील तपशील व शेतकऱ्यांनी करावयाची कार्यवाही :
प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, बँकेचा तपशील, विशिष्ट क्रमांक, 31 मार्च 2026 रोजीची थकीत कर्ज रक्कम (स्तंभ 9), हेअरकट अर्थात सवलत वजा जाता थकीत कर्ज रक्कम (स्तंभ 10), शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा (स्तंभ 11) आणि पात्र शासकीय लाभाची रक्कम (स्तंभ 12) नमूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचे एकच कर्ज खाते असल्यास स्तंभ 11 मध्ये नमूद केलेली स्वतःच्या हिश्शाची रक्कम संबंधित बँक शाखेतील कर्ज खात्यात भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पात्र थकीत कर्ज रक्कम 2 लाख 60 हजार रुपये असल्यास शेतकऱ्याने प्रथम स्वतःचा हिस्सा म्हणून 60 हजार रुपये भरावेत. त्यानंतर योजनेच्या नियमानुसार पात्र OTS रकमेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
शेतकऱ्याची एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास, तो आपला हिस्सा कोणत्याही एका कर्ज खात्यात भरू शकतो. मात्र, एका खात्यात भरावयाची कमाल रक्कम यादीतील स्तंभ 10 मध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा अधिक नसावी. याबाबत संबंधित बँका शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
आधार प्रमाणीकरणासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य
योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक (Agristack) नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करणे अनिवार्य आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तातडीने नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
OTS योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकांकडून दर शुक्रवारी महाआयटी पोर्टलवर अद्ययावत केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा सुरू करण्यात येईल. ही सुविधा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नियुक्त आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरण, तक्रार नोंदणी व तक्रार निवारणाची प्रक्रिया कर्जमाफी योजनेप्रमाणेच राहील. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शासकीय लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात किंवा खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. शासकीय हिस्सा प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक कर्ज खात्याचे लेजर अद्ययावत करेल.
31 मार्च 2027 पर्यंत OTS योजनेची मुदत
एकवेळ समझोता (OTS) योजना 31 मार्च 2027 पर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा पर्याय निवडलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत स्वतःच्या हिश्शाची आवश्यक रक्कम भरून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
