सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन डॉ. रुपेश कुमार झा रुजू
पोटाच्या विकारांवरील उपचारांसह लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होण्याची आशा; नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत
सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन तथा पोटविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश कुमार झा सोमवारी रुजू झाले. त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. झा यांचे स्वागत केले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर, माजी सैनिक अधिकारी दीपक शिर्के व रुग्णालयाच्या अधिकारी रूपाली हेळेकर उपस्थित होते.
डॉ. झा यांनी जे. जे. रुग्णालय, मुंबई येथून एमबीबीएस, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथून एमएस पदवी प्राप्त केली आहे. लातूर जिल्ह्यात सेवा बजावल्यानंतर ते आता सावंतवाडीत रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत. अपेंडिक्स, हर्निया यांसारख्या आजारांवरील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया हे त्यांचे विशेष कौशल्य आहे.
दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करून घेण्याचे आश्वासन नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडीतच आधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
