You are currently viewing प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री गझलकारा अंजली दीक्षित – पंडित लिखित व्हॅलेंटाईन वीक स्पेशल लेख*

 

*प्रेम म्हणजे प्रेम असतं*

 

प्रेम म्हणजे प्रेम असतं

 

प्रेम काय आहे? ते मूर्त असतं का अमूर्त असतं? प्रेम मनात असतं, हृदयात असतं का स्पर्शात असतं? प्रेम ही एक भावना आहे का इच्छा-अपेक्षा आहे? कधी प्रेम हे मृगजळ वाटतं, कधी तो आकाशातला ध्रूवतारा वाटतो तर कधी प्रेम हा मूर्खपणा वाटतो. असं का वाटतंय? काही का असेना प्रेम हे एक असं रसायन आहे की जे हवहवसं वाटतं, स्पर्शावसं वाटतं, मिठीत घ्यावं वाटतं. ती एक जादू आहे, यही जादूची झप्पी मिळाली तर आयुष्यात मिरॅकल घडून येईल.

ज्याला त्याच्या आयुष्यात हवं ते प्रेम मिळालं तर तो आपलं आयुष्य भरभरून जगला असं म्हणायला हरकत नाही…… नीरवच्या मनात असलेच काहीसे विचार घोळत होते. सगळ्यांच्यात असून नसल्यासारखा तो आपल्याच मनातल्या विचारात गुरफटून गेलेला असायचा.

 

दाण दाण बूट वाजवत अमृता कट्ट्याकडे येत ओरडली,

‘काय चालवलंय हे सगळ्यांनी?’

 

‘कशाबद्दल बोलतेस तू?’ नीरव, आशिष,

जीतू लेक्चरच्या ब्रेकमधे कॉलेज कट्ट्यावर ऊन खात, टाईमपास करत बसलेले; एक साथ ओरडले.नीरवची तंद्री धाडकन् तुटली.

 

‘तुला कळतंय तरी वेड घेऊन पेडगावला नको जाऊस,…. हेच!!!’

अमृताच्या रेखीव भुवया वक्र झाल्या नि थरथरणाऱ्या नाकाचा शेंडा लाल. रागावलेली नजर नीरववर स्थिरावली.

 

एवढ्या कडाक्याच्या थंडीत हिला काय झालं तापायला हे तिघांनाही कळेना.

 

‘हेच म्हणजे? काय कळतंय मला?’ नीरवला एकट्याला तोफेच्या तोंडी देऊन बाकी दोघांनी कल्टी मारली. बिचारा आधीच बुचकळ्यात पडलेला, त्यात एकटा.

 

‘तुझं नाव माझ्या नावाला का जोडतात सगळे?’

 

एखादी सुंदर मुलगी चिडली की किती गोड दिसू शकते असं वाटून गेलं त्याला

‘हे मला काय माहिती? कोण जोडते त्यांना विचार?’

 

‘हे बघ मला तशा कुठल्याही फिलिंग नाहीत तुझ्याबद्दल’. वाऱ्यावर उडणारे केस सावरत अमृता फणकाऱ्यानं बोलली.

 

‘ए, हॅलो, मी कुठे जबरदस्ती करतोय पण? तुला प्रपोज केलं, तू फ्रेंड्स म्हणालीस… ओके. माझी काहीच तक्रार नाही. तू उगाच पॅनिक नको होऊस.’

नीरवचा समजुतीचा सूर तिला नकळत आवडून गेला.

 

‘हे बघ, नीरव, मला माझं करिअर करायचंय. तेही द बेस्ट. आणि अर्थात तुलाही तुझं. पुढच्या चार-पाच वर्षानंतर तू कुठे असशील मी कुठे असेल वी डोन्ट नो. कुणालाच कॉम्प्रमाईज करायला लागू नये.’ आता अमृताचंही नरमाईचं धोरण.

 

‘मान्य आहे गं मला. मग आता कॉलेजमध्ये सुद्धा बोलायचं नाही का आपण? मी तुला डिस्टर्ब करतोय का?’

नीरवच्या सपशेल शरणागतीनं ती गडबडली.

 

‘तू कशाला डिस्टर्ब करशील मला? तशा फीलिंग्स नाहीत मला तर मी का डिस्टर्ब होईन?’

 

‘ मग झालं तर; माझं प्रेम माझ्याजवळ ठेवतोय मी. आटोकाठ प्रयत्न करतोय तसा.’

 

‘पण तुझे डोळे…. ‘

 

‘आता काय बघायचंही नाही का तुझ्याकडे?’

 

‘ नाही; ते वेगळं बघतात माझ्याकडे.’

 

‘ म्हणजे तिरळा वगैरे बघतो की काय मी?’ नीरवची ही मिश्किल हासत बोलायची स्टाईल जाम आवडते तिला.

 

आता तीही बरीच रिलॅक्स होऊन बोलते,

‘गप रे बघावं तेव्हा चेष्टा. तुझे डोळे सतत शोधत असतात मला. मी जिथे जिथे जाते तिथे ते येतात. मला तसा भास होतो. आय डोंट नो व्हाय.’

 

‘ काय मुलगी आहेस ग तू? तुला नक्की प्रॉब्लेम काय आहे ना तेच कळत नाही? असं करतो आता उद्यापासून सगळे लेक्चर्स बँक मारतो फक्त प्रॅक्टिकलला येतो,तीही बॅच बदलून घेतो. मग तर झालं मनासारखं?’

 

‘ निरव, असं नको म्हणू ना यार. मला काहीच कळेना झालंय.’

 

‘एक मिनिट एक मिनिट, तुला कसं कळलं पण की माझे डोळे तुला शोधतात ते?’

 

एक लाजाळू झुळूक मधूनच वाट काढत तिच्या गालांना स्पर्शून जाते.

‘ते कळतच ना मुलींना!’

तिचे सावळे गाल गुलाबी झाल्यासारखे वाटले त्याला क्षणभर.

 

‘ अच्छा अच्छा; म्हणजे कुणाचे तरी डोळे आपल्याला शोधत असतात हे बरोबर कळतं, पण स्वतःचे डोळे त्या शोधणाऱ्या डोळ्यांची किती वाट बघतात ते कळत नाही? वा, वा याला काय म्हणायचं? चोराच्या उलट्या का वेड घेऊन पेडगाव?’

 

‘अगं पुरे पुरे, किती मारतेस? फाटेल ती वही’. अमृता पूर्ण जोर लाऊन पण लटक्या रागानं त्याला मारत सुटते.

 

‘ फाटू दे, तुझ्याकडूनच पुन्हा नोट्स घेईन.’

 

‘तुझ्यासाठी पाच वर्षच काय आयुष्यभर लायब्ररीत बसून नोट्स काढायला तयार आहे मी.’

 

………

 

‘इस बात पे कॉफी तो बनती है यार’

 

‘निरव!’

सावळ्या पापण्या आपोआप खाली वळलेल्या , तिच्या नाजूक हाताची पकड त्याच्या हातावर घट्ट झालेली,….. त्याला उठवत उठवतच ती बोलली,

‘चल आता, एकही लेक्चर बँक मारायचा नाही यापुढे, पाच वर्षे अभ्यास म्हणजे अभ्यास, समजलं?’

 

‘जो हुकूम मेरे आका….’

 

©®अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =