You are currently viewing रेडीतील मृतदेह प्रकरणाचा छडा; वडिलांच्या खुनामागे मुलांचेच कारस्थान!
Oplus_16908288

रेडीतील मृतदेह प्रकरणाचा छडा; वडिलांच्या खुनामागे मुलांचेच कारस्थान!

दारूच्या व्यसनातून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून दोघांनी केला खून; एका मुलाला अटक, दुसरा विधिसंघर्षग्रस्त बालक

वेंगुर्ला : रेडी येथील जंगलात १० नोव्हेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलले असून, स्वतःच्या वडिलांचाच खून त्यांच्या दोन मुलांनी संगनमताने केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. दारूच्या नशेत वडील सतत मारहाण करून कुटुंबीयांना त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोन्ही मुलांनी मिळून हा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका मुलाला अटक करण्यात आली असून, दुसरा विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.

दाऊद मुसाफिर शेख (वय ५६, मूळ रा. बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १० नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेडी येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहाची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, रेल्वेकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या माध्यमातून तपास सुरू केला. तपासादरम्यान हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख दाऊद मुसाफिर शेख अशी पटली. त्याच्या नातेवाईकांची माहिती घेतली असता, त्याचे दोन मुलगे नजर दाऊद आलम (वय ३२) आणि त्याचा लहान भाऊ हे सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, रेडकरवाडी येथे राहत असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मृत व्यक्ती आपले वडील असल्याचे दोघांनी मान्य केले. वडील दारूच्या नशेत सतत मारहाण करून कुटुंबीयांना त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमताने त्यांचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेह जंगलमय परिसरात नेऊन टाकल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे, एटीबी, सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालय तसेच सीसीटीएनएसच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा