You are currently viewing आज चंद्रभागा दिसे

आज चंद्रभागा दिसे

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

आज चंद्रभागा दिसे पहा साजिरी गोजिरि
लक्ष लक्ष पाउलांनी कशी व्यापली पंढरी ।।
वाट संपता संपेना
पाय झाले रे पाचोळा
घाम माथिचा सुके ना
तरी लावला रे टिळा
जिव्हा नादावली गाया तुझ्या नामाची वॆखरी
लक्ष लक्ष पाउलांनी कशी व्यापली पंढरी ll

डोळे दिपले कसे रे
तुझ्या रूपाचे गारूड
कानी भरतात वारे
तुझे भजन, भारूड
देह गोपीका तु कान्हा मन होऊ दे बांसरी
लक्ष लक्ष पाउलांनी कशी व्यापली पंढरी ll

उभा जन्म मी साधला
तुझ्या कृपेचा आधार
माझ्या साठी मांडिला तू
फक्त सुखांचा बाजार
हात कटी वरी जरी चरण राहो माझे उरी
लक्ष लक्ष पाउलांनी कशी व्यापली पंढरी ll

एक मागतो ते देई
क्षमा करी पंढरी राया
नको काया नको माया
व्यर्थ शिणलों मी वाया
वसो अंतरात्मा आतां इथे होऊन पायरी
लक्ष लक्ष पाउलांनी कशी व्यापली पंढरीll

आज चंद्रभागा दिसे पहा साजिरि गोजिरी
लक्ष लक्ष पाउलां नि कशि व्यापली पंढरीll

*अरविंद ढवळीकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =