सावंतवाडी वनविभागाची धडक कारवाई; १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी :
सावंतवाडी वन परिक्षेत्रातील मौजे चराठे येथील शासकीय वनातून बेकायदेशीरपणे सागाच्या झाडांची तोड करून तस्करी करण्याचा प्रयत्न सावंतवाडी वनविभागाने यशस्वीरित्या हाणून पाडला आहे. या धडक कारवाईत वनविभागाने दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भानुदास दत्ताराम देसाई आणि भूषण दत्ताराम देसाई अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखी एका तिसऱ्या आरोपीचा सहभाग असून वनविभाग त्याचा कसून शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चराठे येथील शासकीय वनात काही अज्ञात झाडांची तोड करून माल पळवून नेण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी चराठे येथील शासकीय वनात दबा धरला होता. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन तेथून जात असताना वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने गाडी न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून चराठे येथेच वाहन अडवून त्याची तपासणी केली.
या तपासणी दरम्यान आयशर ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक केला जाणारा ५ नग साग गोल माल आढळला. संबंधित वाहन माजगाव येथील भानुदास दत्ताराम देसाई यांच्या मालकीचे असून त्यांनी मौजे चराठे वन स.नं. २७० मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून ही झाडे तोडली होती.
वनविभागाने वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक आणि सागाचा माल जप्त करून उपरल विक्री आगारात जमा केला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित भानुदास देसाई याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचा भाऊ भूषण दत्ताराम देसाई याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर वनविभागाने आज भूषण देसाई याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि घराची झडती घेतली.
यावेळी त्यांच्या घरात बेकायदेशीररित्या तयार केलेला १ सोफासेट, २ खुर्च्या, टिपॉय, ६ नग साग गोल आणि चिरिव सागाच्या लाकडाचा साठा आढळून आला, जो वनविभागाने जप्त केला आहे.
या संपूर्ण गुन्हाप्रकरणी आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१ ई, फ) व ४१ (२) ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत माजगावचे वनपाल प्रमोद राणे, कोलगाव उत्तरेचे वनरक्षक अक्षय कुंभार, माजगावचे वनरक्षक सुशांत चोथे आणि मळगाव उत्तरेचे वनरक्षक सुनील गडदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे.
