आंबोली घाटात धबधब्याजवळ डस्टर कारने घेतला पेट
बॅटरी भागातून अचानक स्फोटासारखा आवाज; काही क्षणांत कार जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
आंबोली (प्रतिनिधी) :
आंबोली घाटमार्गातील मुख्य धबधब्याजवळ सोमवारी दुपारी एका डस्टर कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण गाडीला वेढल्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी आधीच बाहेर उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज येथील अमरनाथ अशोकराव गवळी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी दुपारी ते आंबोली मार्गे गडहिंग्लजकडे परतत असताना आंबोली धबधब्याच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत त्यांनी आपली डस्टर कार (MH 09 DM 6891) उभी केली. अमरनाथ गवळी यांच्यासह कुटुंबातील चार जण गाडीबाहेर उतरून जेवण करत होते.
यावेळी अचानक गाडीच्या समोरील बॅटरीच्या भागातून मोठा आवाज झाला आणि धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून गवळी यांनी गाडीचे बोनेट उघडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक बिघाडामुळे बोनेट उघडले नाही आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण कार जळून खाक झाली.
घटनेनंतर अमरनाथ गवळी यांनी दुसऱ्या वाहनाच्या मदतीने आपल्या कुटुंबाला सुरक्षितपणे गडहिंग्लज येथे रवाना केले. घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार संतोष गलोले, हवालदार लक्ष्मण काळे आणि कॉन्स्टेबल गौरव परब यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे गाडीने स्वतःच पेट घेतल्याने कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे अमरनाथ गवळी यांनी पोलिसांना सांगितले. उशिरापर्यंत या घटनेची अधिकृत नोंद आंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती.
