युवराज लखमराजे भोसले यांची माहिती
१.५, ३, ५ आणि १० किलोमीटर अशा चार गटांत स्पर्धा; युवा खेळाडूंना ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ होण्याची संधी, ५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन
सावंतवाडी : युवकांमध्ये फिटनेसची आवड निर्माण व्हावी, लपलेली क्रीडा प्रतिभा समोर यावी आणि स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फाउंडेशन, सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेल आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ डिसेंबर २०२६ रोजी ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, १.५ किमी, ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा चार वेगवेगळ्या वयोगटांत ही स्पर्धा पार पडणार आहे. याबाबतची माहिती युवराज लखमराजे भोसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुप्रिया मोडक, शिवम घोगळे, जॉन्सन फर्नांडिस आदी उपस्थित होते. सावंतवाडी तलाव परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य स्पर्धेचा प्रारंभ सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजवाड्यापासून होणार आहे.
वयोगटानुसार चार श्रेणींमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. १६ ते ३९ वयोगटासाठी १० किमी रनचे रिपोर्टिंग सकाळी ५:३० वाजता आणि सुरुवात सकाळी ६:०० वाजता होईल. १३ ते १६ वयोगटासाठी ५ किमी रनचे रिपोर्टिंग सकाळी ६:०० वाजता आणि सुरुवात सकाळी ६:३० वाजता होईल. १० ते १३ वयोगटासाठी ३ किमी रनचे रिपोर्टिंग सकाळी ६:३० वाजता आणि सुरुवात सकाळी ७:०० वाजता होईल. तर ७ ते १० वयोगटासाठी १.५ किमी रनचे रिपोर्टिंग सकाळी ७:०० वाजता आणि सुरुवात सकाळी ७:३० वाजता होईल.
दरवर्षी ‘सिंधू रन’च्या माध्यमातून ‘२४ तास रन’सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यंदाही स्पर्धेत विविध विशेष उपक्रमांची जोड देण्यात आली आहे.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी धावपटूंना केवळ सहभागाचे प्रमाणपत्र न देता, त्यांनी पूर्ण केलेले अंतर आणि त्यासाठी लागलेला अचूक वेळ याची नोंद असलेले ‘टायमिंग सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे. यामुळे खेळाडूंना स्वतःच्या कामगिरीचे अचूक मूल्यमापन करता येणार असून, भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना याचा फायदा होईल. याशिवाय सर्व नोंदणीकृत सहभागींना टी-शर्ट, पदक आणि पूर्णता प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेदरम्यान पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. तसेच स्पर्धेनंतर अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे.
यंदाच्या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १० ते १२ स्थानिक गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना ‘सिंधू रन’चे ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ होण्याची संधी दिली जाणार आहे. या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना ओळख व प्रसिद्धी मिळण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क पुढीलप्रमाणे ठेवण्यात आले आहे. १० किमी गटासाठी ८५० रुपये, ५ किमी गटासाठी ७५० रुपये, ३ किमी गटासाठी ६५० रुपये आणि १.५ किमी गटासाठी ५५० रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी ५ डिसेंबर २०२६ पर्यंत www.Sindhurunners.com या संकेतस्थळावरून किंवा पोस्टरवरील क्यूआर कोडद्वारे आपली नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील ‘Sindhu-_Runners_07’ या पेजला भेट द्यावी.
तरुण खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि क्रीडाक्षेत्रात भविष्य घडवण्याची ही उत्तम संधी असून, जास्तीत जास्त युवक, विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मुलांसह उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन युवराज लखमराजे भोसले आणि सिंधू रनर्स टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
