You are currently viewing कुडाळ-मालवणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी; नऊ विभागांसाठी प्रभारी नियुक्ती
Oplus_16908288

कुडाळ-मालवणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी; नऊ विभागांसाठी प्रभारी नियुक्ती

२६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान पुनर्रचना सप्ताह; आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गावपातळीवर संघटनाबांधणी.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती जाहीर; नऊ जिल्हा परिषद विभागांसाठी प्रभारींची निवड.

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या आमदारकीला दोन वर्षे पूर्ण होत असताना कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत मतदारसंघात शिवसेनेचा पुनर्रचना सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी केली जाणार असून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह रिक्त पदे भरली जाणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दत्ता सामंत म्हणाले की, आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळातील अभ्यासपूर्ण मांडणीच्या माध्यमातून २८८ मतदारसंघांमध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघाला टॉप टेनमध्ये स्थान मिळवून दिले आहे. शेतकरी, मच्छीमार, दशावतार कलाकार, आकारीपड आणि वनसंज्ञा यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्यावर विश्वास असून, नारायण राणे यांनाही त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटेल, असे कार्य ते करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांत उबाठा गटासह अन्य पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासकीय कामात व्यस्त झाले आहेत. शिवसेनेच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या पद्धतीनुसार काही पदे रिक्त होणार असून, ती नवीन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. संघटना शिस्तबद्ध आणि सक्षम करण्यासाठी ही पुनर्रचना मोहीम राबविण्यात येत आहे.

आमदार निलेश राणे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांची सिंधुदुर्ग शिवसेनेच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा दत्ता सामंत यांनी केली. तसेच कुडाळ तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद विभागांसाठी प्रभारींची निवड करण्यात आली आहे.

नऊ विभागांचे प्रभारी पुढीलप्रमाणे :

– आंब्रड – देवेंद्र नाईक

– घावनळे – दत्ता कोरगावकर

– माणगाव – दिनेश साळगावकर

– तेंडोली – आनंद शिरवलकर

– वेताळबांबर्डे – मिलिंद नाईक

– पिंगुळी – अनिकेत तेंडोलकर

– नेरूर – अरविंद करलकर

– ओरोस – निखिल कांदळगावकर

– पावशी – संजय भोगटे

 

हे सर्व प्रभारी संबंधित विभागप्रमुखांसोबत काम करणार आहेत. २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी बैठका घेऊन संघटनात्मक पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकृत पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी कुडाळ-मालवणमध्ये स्वतंत्र मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, माणगाव शहरप्रमुखपदी अविनाश राणे यांची निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, दिनेश साळगावकर, अरविंद करलकर, सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, राजन भगत, देवेंद्र नाईक, शहरप्रमुख अभिषेक गावडे, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, अनिकेत तेंडोलकर, संजय भोगटे, विनायक आणावकर, दिनेश वारंग, अवधूत सामंत, प्राजक्त चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा