You are currently viewing ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत सिंधुदुर्गात जागरूकता कार्यक्रम संपन्न

‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत सिंधुदुर्गात जागरूकता कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्ग : जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ (Maha-UPLABDHI) मोबाईल ॲपबाबत राज्यस्तरीय जागरूकता कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा कोषागार अधिकारी अरूणा हसबे, अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे, नीता सावंत व सुषमा खराडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारेच्या संचालक दीपा देशपांडे तसेच वित्त विभागाच्या प्रधान सचिव (लेखा व कोषागारे) डॉ. रिचा बागला (भा.प्र.से.) यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्या वतीने ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

‘महा-उपलब्धी’ ॲपच्या पहिल्या टप्प्यात निवृत्ती वेतन धारकांना घरबसल्या मासिक व वार्षिक निवृत्ती वेतनाचा तपशील, आयकर दाखला, e-PPO लायब्ररी तसेच उत्पन्नाचा दाखला PDF स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ॲपच्या पुढील टप्प्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हा कोषागार कार्यालयाने तयार केलेल्या ‘महा-उपलब्धी’ ॲपच्या उपयुक्ततेबाबतच्या जनजागृतीपर व्हिडिओची वित्त विभागाच्या प्रधान सचिवांनी दखल घेतली. हा व्हिडिओ राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयांमध्ये थेट प्रक्षेपित करण्यात आला.

‘महा-उपलब्धी’ ॲप उपयुक्त आणि वापरण्यास सुलभ असल्याने निवृत्तीवेतनधारकांनी ॲपबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप जिल्हा कोषागार अधिकारी अरूणा हसबे यांच्या मनोगत व आभार प्रदर्शनाने झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा