सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच, हा सण शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून सांगली जिल्ह्यात गणेशोत्सवातील मिरवणुका, कार्यक्रम व सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट प्रकारचे मुखवटे वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी महिला, मुले, वृद्ध व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. काही व्यक्ती राक्षस, भूत, देव, दानव तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे घालून देखावे पाहण्यासाठी अथवा मिरवणुकीत सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मुखवट्यांमुळे लहान मुले, वृद्ध व नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असून काही समाजकंटक किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी त्याचा गैरवापर करू शकतात, अशी शक्यता आदेशात नमूद करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण सांगली जिल्ह्यात 21 सप्टेंबर 2026 रोजी 21.00 वाजल्यापासून ते 26 सप्टेंबर 2026 रोजीचे 23.59 या वेळेत गणेशोत्सव-2026 च्या अनुषंगाने मिरवणुका, कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणे, मार्ग व रस्त्यांवर, कोणत्याही व्यक्ती, सार्वजनिक मंडळातील सदस्य यांना देखावे पाहण्यासाठी व मिरवणुकीमध्ये सामील होत असताना विशिष्ट प्रकारचे (राक्षस, भूत, देव, दानवांचे, प्राण्यांचे) मुखवटे वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
