जुन्या शिवसैनिकांचा १३ नोव्हेंबरला हुमरठ येथे स्नेहमेळावा
१९८३ ते १९९० या काळातील शिवसैनिक एकत्र येणार; संघर्षमय आठवणींना मिळणार उजाळा
कणकवली
१९८३ मध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेल्या शिवसेनेच्या प्रवासातील जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सावली, हुमरठ येथे हा मेळावा होणार आहे.
‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार घेऊन मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्याकाळी अनेक शिवसैनिकांनी कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय गावोगावी संघटनेचे काम केले. संघर्ष, जिद्द आणि मैत्रीच्या बळावर उभ्या राहिलेल्या या प्रवासातील आठवणींना या मेळाव्यात उजाळा मिळणार आहे.
राजकीय भूमिका आणि वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी जुन्या सहकाऱ्यांमधील स्नेह कायम आहे. त्यामुळे १९८३ ते १९९० या कालखंडातील आजी-माजी शिवसैनिक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर, नागेश मोर्ये, बाळा पाटकर, राजू राणे, बाळा राणे, रवि सावंत, चंदू हरियाण, बाळा शेट्ये आणि बबन कर्णिक यांनी हे आवाहन केले आहे.
