सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
गणेशोत्सव, गणपती विसर्जन मिरवणुका तसेच शहरातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावेत, यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी सार्वजनिक ठिकाणी Compressed-Air Confetti Poppers / Party Poppers तसेच त्यामधून बाहेर पडणारे प्लास्टिक किंवा मेटॅलिक कन्फेटी व स्ट्रीमर्स यांच्या वापरावर सक्त प्रतिबंध घालण्याचा आदेश आज जारी केला आहे.
हा आदेश महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, चौक, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणे, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणुका, इतर धार्मिक/सामाजिक/सांस्कृतिक मिरवणुका, सार्वजनिक सभा व कार्यक्रम तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखालील ठिकाणी लागू राहणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये Compressed-Air Confetti papers, Party Poppers, तत्सम पॉपर्स/उपकरणे, त्यामधून बाहेर पडणारे प्लास्टिक किंवा मेटॅलिक कन्फेटी, प्लास्टिक/मेटॅलिक स्ट्रीमर्स यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव, गणपती विसर्जन मिरवणुका तसेच इतर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक मिरवणुकांमध्ये या साहित्याचा वापर होणार नाही, याची संबंधित आयोजक व मंडळांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी Confetti Poppers च्या वापरामुळे अचानक मोठा आवाज निर्माण होऊन नागरिकांमध्ये घबराट किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्दीच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या उपकरणांचा वापर टाळणे आवश्यक आहे.
याशिवाय या पॉपर्समधून बाहेर पडणारे कागद, प्लास्टिक, मेटॅलिक स्ट्रीमर्स आदी साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी विखुरल्याने स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो आणि कचरा संकलनात अडचणी निर्माण होतात.
गणेशोत्सव व मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात कन्फेटी किंवा प्लास्टिक साहित्य रस्त्यावर विखुरल्यास ते गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे आव्हानात्मक ठरते.
त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील कचरा व्यवस्थापन या बाबींचा विचार करून महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रातील प्लास्टिक व थर्माकोल उत्पादनांबाबत २०१८ पासूनच्या अधिसूचना व त्यानंतरच्या सुधारणा उपलब्ध आहेत.
महापालिका प्रशासनाने सर्व गणेशोत्सव मंडळे, गणपती विसर्जन मिरवणूक आयोजक तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत—
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांना Confetti Poppers / Party Poppers वापरण्यास मनाई असल्याची आगाऊ माहिती द्यावी. महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या परवानगीतील संबंधित अटींचे काटेकोरपणे पालन करावे.
कन्फेटी, प्लास्टिक, कागद किंवा अन्य साहित्य रस्त्यावर विखुरले जाणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
उत्सवाचा आनंद साजरा करताना सार्वजनिक सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाचे भान ठेवावे.
महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक आयोजक आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, “गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव आहे. उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणाची जबाबदारीही आपण सर्वांनी जपली पाहिजे. Confetti Poppers, Party Poppers किंवा प्लास्टिक/मेटॅलिक कन्फेटीचा वापर न करता सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा.”
महानगरपालिका आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास लागू असलेल्या कायदेशीर व प्रशासकीय तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक किंवा अन्य कचरा विखुरल्यास संबंधितांवर स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या लागू तरतुदींनुसार स्वतंत्र कारवाई केली जाऊ शकते.
आवश्यकतेनुसार संबंधित प्रकरण पोलीस प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांनंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करावा लागतो. कन्फेटी, प्लास्टिक व मेटॅलिक स्ट्रीमर्सचा वापर टाळल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांचे श्रम कमी होण्यास तसेच मिरवणूक मार्ग लवकर स्वच्छ करण्यास मदत होणार आहे.
सर्व नागरिक, गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक आयोजक आणि संबंधितांनी महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून स्वच्छ, सुरक्षित, शांततामय व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
