You are currently viewing कवितांच्या बहारदार मैफलीने पिंपरी-चिंचवड महोत्सवात रंगत

कवितांच्या बहारदार मैफलीने पिंपरी-चिंचवड महोत्सवात रंगत

चिंचवड :

दिनांक २० सप्टेंबर रोजी रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील मोरया गोसावी रंगमंच सभागृहात पिंपरी-चिंचवड महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कवीसंमेलनात विविध विषयांवरील कवितांनी रसिकांची मने जिंकली. शब्द, भावना, विचार आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम या कवीसंमेलनातून अनुभवायला मिळाला.

कवीसंमेलनाच्या प्रारंभी आदरणीय विरोधी पक्षनेते तथा लोकनेते भाऊसाहेब भोईर यांचा काव्यपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित रसिक, साहित्यिक आणि कलाकारांना संबोधित करताना भाऊसाहेब भोईर यांनी मनोगत व्यक्त केले.

“पुणे ही जर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेल, तर पिंपरी-चिंचवड ही सांस्कृतिक उपराजधानी आहे,” असे नमूद करत त्यांनी पिंपरी-चिंचवडकर कला, साहित्य, संस्कृती तसेच विविध क्षेत्रांत कुठेही कमी नाहीत, असे सांगितले. पिंपरी-चिंचवड महोत्सव तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू झाल्याने गणेशभक्त, रसिक, साहित्यिक आणि कलाकारांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कवीसंमेलनात वंदना इन्नानी, राजेंद्र घावटे, तुकाराम पाटील, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, सुरेश कंक, अरुण कांबळे, पौर्णिमा कोल्हे, निलेश शेंबेकर, दिनेश भोसले, सविता इंगळे, देवेंद्र गावंडे, प्रदीप गांधलीकर, पितांबर लोहार, सुभाष चव्हाण, झुबेन शेख, नीलिमा फाटक, सुप्रिया लिमये, हेमंत जोशी, माधुरी डिसुझा, हिंगणकर कवी, संजय सिंगलवार, आय. के. शेख, रेणुका हजारे, संदीप चव्हाण, माधुरी विधाटे आणि अशोक टाकळे यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कधी सामाजिक वास्तवाचे भान जागवणाऱ्या, कधी नात्यांची हळवी वीण गुंफणाऱ्या, तर कधी जीवनातील विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या कवितांनी वातावरण भारावून गेले. प्रत्येक कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या संपूर्ण कवीसंमेलनाचे कैलास भैरट आणि सीमा गांधी यांनी बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या प्रभावी निवेदनशैलीमुळे कवी, कविता आणि रसिक यांच्यातील संवाद अधिकच खुलत गेला.

पिंपरी-चिंचवडच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कवीसंमेलनाने महोत्सवाच्या आनंदात सुंदर काव्यरंग भरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा