You are currently viewing नागनाथ फटाले पत्रकारिता जीवन साधना गौरव पुरस्कार विजय कुवळेकरांना जाहीर

नागनाथ फटाले पत्रकारिता जीवन साधना गौरव पुरस्कार विजय कुवळेकरांना जाहीर

२२ सष्टेंबर ला समारंभपूर्वक वितरण मानकन्हैया ट्रस्टची पत्रपरिषद

सांगली / (प्रदीप जोशी ज्येष्ठ पत्रकार) :

छत्रपती संभाजीनगर येथील मानकन्हैय्या ट्रस्टच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला नागनाथ फटाले पत्रकारिता जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती श्री नागनाथ फटाले यांची कन्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांनी दिली. आय. एम. ए. सभागृहात २२ सष्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा असून, प्रमुख अतिथी म्हणून महापौर समीर राजूरकर उपस्थित राहतील, अशी माहिती फटाले यांच्या कन्या डॉ. सुधाताई कांकरिया यांनी रविवारी, ६ रोजी पत्रपरिषदेत दिली. यावेळी डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. हेमंत फटाले, प्रशांत फटाले उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी ६० वर्षांहून अधिक काळ महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. पत्रकारितेसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व ज्योतिषशास्त्र विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. ग्राहक चळवळ, ग्रंथालय चळवळ, हमाल पंचायत चळवळ आदी अनेक सामाजिक चळवळीचे ते जनक आहेत.

त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी मानकन्हैय्या ट्रस्ट, अहिल्यानगरद्वारे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मानकन्हैया ट्रस्टचे नेत्रदान चळवळीसह स्त्रीजन्माचे स्वागत करा-बेटी बचाओचे देशव्यापी सामाजिक कार्य तसेच सांस्कृतिक, पर्यावरण व शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे.

विजय कुवळेकर यांनी पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारितेसह साहित्य, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. केसरी आणि सकाळपासून सुरू झालेला त्यांचा पत्रकारितेचा प्रवास पुढे विविध आघाडीच्या वृत्तपत्रांसह विविध वृत्तवाहिन्यांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. विधायक, विकासात्मक आणि समाजाभिमुख पत्रकारितेला त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले आहे. पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, नरूभाऊ लिमये पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार आदींसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून,आता नागनाथ फटाले पत्रकारिता जीवनसाधना गौरव पुरस्काराची त्यात भर पडत असल्याचे डॉ. सुधाताई कांकरिया म्हणाल्या.

याप्रसंगी डॉ. सुधाताई कांकरिया संपादित नागथान फटाले यांच्यावर आधारित ‘आधारस्तंभ’ स्मरणिकेचे प्रकाशनही समारंभात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थित रहाण्याचे आवाहन डॉ. हेमंत फटाले यांनी केले आहे.

पत्रपरिषदप्रसंगी अरुणा फटाले, डॉ. प्रिती फटाले, डॉ. वर्धमान कांकरिया, सुनिता फटाले, सुनील फटाले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा