You are currently viewing ‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत

‘श्यामची आई’ आता चिनी भाषेत

तळेरे गावच्या रसिका पावसकर यांनी केला अनुवाद

कणकवली

भारतीय तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले असून ‘अनाम प्रेम’ तर्फे रविवार २९ जानेवारी २०२३ रोजी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

चिनी भाषेत अनुवादित ‘श्यामची आई’चे प्रकाशन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला येथे रविवार २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

मूळ कणकवली तालुक्यातील तळेरे गावची रहिवाशी असलेल्या रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या हनान प्रोविन्समधील “चंगचौ” युनिव्हर्सिटीत चिनी भाषा शिकवण्याची पदवीशिक्षण घेत आहेत. एका व्रतस्थ व्यक्तीकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार एका आईचे, पूज्य सानेगुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून “श्यामची आई” चिनी अनुवादित करण्यात येत आहे.

‘श्यामची आई’ ही कादंबरी पूज्य साने गुरुजी यांनी १९३३ मध्ये लिहिली असून मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना मांडलेल्या आहेत. या पुस्तकाच्या लाखो प्रती मराठी कुटुंबीय व इतर समाजातील लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचे वर्णन मातृप्रेमाचे, महामंगल “स्तोत्र” असे केले आहे. या पुस्तकाला वाचकांचा उस्फुर्त व उदंड प्रतिसाद मिळाला. शिवाय आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या व १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटाद्वारे आईची महती घराघरात पोहोचली आहे. भारत सरकारने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सोहळ्यामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून ‘गोल्डन लोटस’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आईला देवता मानणारी भारतीय संस्कृती आता परदेशातही पोहोचावी असा रसिका पावसकर यांचा मानस आहे. आई ही आईच असते. तिच्याबद्दल आपण व्यक्त होऊ शक्त नाही. आपले मन व हृदय तिच्या प्रेमाने भरलेले आहे.
हृदयस्थ व सत्य भावनेने भारलेली पुस्तके हृदयाला भिडतात, याची अनुभूती देणारी अनेक मराठी पुस्तके आहेत. आई व मातृत्व यावर सुद्धा अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. अशा हृदयस्थ पुस्तकांमधे “श्यामची आई” चे स्थान गेली नऊ दशके अग्रगण्य आहे. “श्यामची आई”चे विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. परंतु चिनी भाषेत आतापर्यंत अनुवाद झाला नव्हता. त्यामुळे अनाम प्रेम परिवारातील रसिका प्रभाकर पावसकर हिने “श्यामची आई” या मराठी साहित्यातील पवित्र महन्मंगल पुस्तकाचा चायनीज भाषेमध्ये अनुवाद केला आहे.

रसिका यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयातील कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. आणि चीनमध्ये हनान प्रोव्हिन्स चंगचौ विद्यापीठामध्ये चायनीज भाषेमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − five =