आंबोली घाटात वादळी पावसाने तीन झाडे कोसळली; वाहतूक ठप्प
पोलिस व स्थानिकांच्या तत्परतेमुळे काही वेळातच मार्ग मोकळा
आंबोली | प्रतिनिधी :
मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सोमवारी सायंकाळी आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर तीन मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आंबोली पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे झाडे हटवून वाहतूक अल्पावधीतच पूर्ववत करण्यात आली.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे आंबोली घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असून वाहनांचीही वर्दळ वाढली आहे. सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान घाटातील मुख्य मार्गावर तीन ठिकाणी मोठी झाडे कोसळली. झाडे रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि पर्यटकांचा मोठा खोळंबा झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनिष शिंदे आणि रामदास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले.
सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून रस्त्यावरील झाडे हटविण्यात यश आले आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पर्यटकांनी प्रशासन आणि पोलीस विभागाचे विशेष आभार मानले. मान्सूनपूर्व काळात अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
