अनधिकृत कबड्डी पंच शिबिरापासून दूर राहा; नोंदणीकृत जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आवाहन
‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी’ची नोंदणी रद्द असल्याचा दावा; खेळाडू, पंच, प्रशिक्षक व पालकांना शुल्क न भरण्याचे आवाहन
सावंतवाडी
सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या दि. २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कथित “जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरा”बाबत कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पालक व क्रीडाप्रेमींनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणीकृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर शिबिराचे आयोजन करणाऱ्या ‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी’ या संस्थेची सार्वजनिक विश्वस्त नोंदणी (PTR) धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने सन २०१६ ते २०२७ या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. स्पोर्ट्स कोडचे उल्लंघन, संस्थापक अध्यक्षांना हयात असताना मयत दाखविणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच जिल्हा संलग्न तालुका असोसिएशनबाबतच्या कथित अनियमितता आदी कारणांमुळे ही कारवाई झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर खेळाडू, पंच, प्रशिक्षक व पालकांनी अशा अनधिकृत उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नये तसेच कोणतेही शुल्क भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या विविध संस्थांनीही संबंधित संस्थेच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित करू नयेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कबड्डी खेळाशी संबंधित अधिकृत प्रशिक्षण, पंच परीक्षा किंवा अन्य उपक्रमांची माहिती केवळ नोंदणीकृत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सावंतवाडी यांच्याकडूनच घ्यावी, असेही अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी नोंदणीकृत विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष रुजारिओ पिंटो, उपाध्यक्ष अजित गोगटे, दिलीप रावराणे व तुषार (तुकाराम) साळगावकर, कार्यवाह दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, खजिनदार मार्टिन आल्मेडा, सहकार्यवाह विजयकुमार साळुखे व नितीन हडकर यांच्यासह अनंत गुरव, शैलेश नाईक, नारायण कोठावळे, दत्तात्रय पनवेलकर, संजय सावंत आणि सौ. अनिता सडवेलकर (उर्फ शारदा गावडे) यांचा सदस्य म्हणून समावेश असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
