*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भाऊबीज*
तू किती छोटा होतास
मी तुझी मोठी ताई….
आंघोळ ,भांग पावडर
तुझे आवडीने करायचे बाई..
रडला की कडेवर
रागवेल आई नाही तर
शांत समंजस तेव्हाही
खेळवायचे तुला घरभर…
बालकमंदिरात सोडताना
मला बिलगून बसायचा
तुझ्यासोबत मीही खेळत
वेळ तिथेच काढायचा…
शाळेतून मी येताच
कित्ती आनंद होई
तुला उचलता कडेवर
हसू गालावर येई….
झरझर सरले दिवस
आले मीही सासरी
शिकून मोठा झालास
घेतली उंच भरारी….
कौतुक तुझे बघताना
मान माझी उंचावते
भाऊराया सुखी रहावा
मनात आशा करते…
भेटी झाल्यात कमी
क्वचितच ती भाऊबीज
आवर्जून भेटावं अशी
कोणतीच नसते तजवीज…
खुशाली कळते फोनवर
आनंदात तू ,मी सुखात
माहेर मात्र दाटून येतं
ओथंबून आलेल्या काळजात।।
!~~~~~🌙~~~~~~!
अरुणा दुद्दलवार
