You are currently viewing आरेकर खानावळीतील महिला कर्मचाऱ्याला सर्पदंश; तातडीच्या उपचारांनी धोका टळला

आरेकर खानावळीतील महिला कर्मचाऱ्याला सर्पदंश; तातडीच्या उपचारांनी धोका टळला

आरेकर खानावळीतील महिला कर्मचाऱ्याला सर्पदंश; तातडीच्या उपचारांनी धोका टळला

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे संयोजक रवी जाधव यांनी रुग्ण व नातेवाईकांना दिला धीर; रक्तचाचणी अहवालानंतर प्रकृती स्थिर

सावंतवाडी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील निलेश आरेकर यांच्या खानावळीत काम करणाऱ्या सौ. समीक्षा संतोष परब (वय ४०, रा. कारिवडे-पेडवेवाडी) यांना रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या पटांगणात काम करत असताना सर्पदंश झाला. घटना घडताच हॉटेलचे मालक निलेश आरेकर व सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात डॉ. वैभव मारुती बदरवाड, डॉ. सभा खान आणि डॉ. अनिकेत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपचार सुरू करण्यात आले. प्रथम रक्तचाचणी करण्यात आली. मॅन्युअल तसेच प्रयोगशाळेतील तपासणीनंतर आलेल्या अहवालानुसार कोणत्याही प्रकारची गंभीर विषबाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आवश्यक इंजेक्शन व औषधोपचार देण्यात आले असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच सामाजिक बांधिलकी विभागाचे संयोजक रवी जाधव यांनी रुग्णालयात भेट देऊन समीक्षा परब, त्यांच्या नातेवाईकांना तसेच हॉटेल मालकांना धीर दिला. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाची योग्य ती काळजी घेण्याची विनंती केली.
यावेळी राजू मसुरकर यांनी डॉक्टरांनी तातडीने उपचार करून रक्तचाचणीचा अहवाल अल्पावधीत उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल करून सहकार्य करणारे हॉटेलचे मालक निलेश आरेकर, कर्मचारी व रुग्णाच्या नातेवाईकांचेही त्यांनी आभार मानले.
गोरगरीब व गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व सामाजिक बांधिलकी विभाग नेहमीच तत्पर असल्याचे राजू मसुरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा