मळेवाडजवळ पिकअप गाडी गटारात पलटी; तिघे थोडक्यात बचावले
पावसामुळे निसरड्या वळणावर चालकाचा ताबा सुटला; दोघे किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान
सावंतवाडी
मळेवाड येथील प्राथमिक शाळेजवळील धोकादायक वळणावर शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पिकअप चारचाकी गाडी गटारात पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दीपक नाईक (वय ४६, रा. शिरोडा) आणि ऋषिकेश कासकर (वय ३१, रा. आरवली) हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने गाडीतील तिन्ही प्रवासी मोठ्या अनर्थातून बचावले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन दोडामार्गहून शिरोड्याकडे जात होते. मळेवाड प्राथमिक शाळेजवळील वळणावर आल्यानंतर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट रस्त्यालगतच्या गटारात जाऊन पलटी झाली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मसके यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात मळेवाड येथील हे वळण अत्यंत निसरडे होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.
