…तर गुन्हेगार कधीच समोर आले नसते….

…तर गुन्हेगार कधीच समोर आले नसते….

महाविकास आघाडी सरकारने टीआरपी घोटाळा प्रकरणी चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी तपासात रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या संभाषणातील तपशील अत्यंत धक्कादायक असून त्यावर बोट ठेवतच जयंत पाटील यांनी मतप्रदर्शन केले आहे. पाटील यांनी अर्णब गोस्वामी यांचा नामोल्लेख टाळला आहे. ‘एक तथाकथित पत्रकाराचे संभाषण’ असा उल्लेख करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर ट्वीट केलं आहे. ‘प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते’, असे जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

‘संबंधित व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत, हे जनतेला कळेल. सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे’, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या, ही बाब गंभीर असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील यांच्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या व्हॉट्सअॅप चॅटवरून भाजपला लक्ष्य केले होते. ‘कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरून दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लीक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे’, अशी भीती रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली होती. त्याशिवाय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या संभाषणावर सडेतोड मत मांडले होते. ‘हे संभाषण अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यात भाजपा आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘AS’ कोण आहे याचे भाजपाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीच सावंत यांनी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा