अमरावती :
महाराष्ट्र शासनाने देशाचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री व अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कृषी शिक्षण संशोधन आणि शेतकरी हितासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. हा कृषी विद्यार्थी दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे .शासनाने तसे आदेश निर्गमित केलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्णयाचे अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी अभिनंदन केले असून महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला अनुकूल असा प्रतिसाद अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने अनुकूल प्रतिसाद दिला असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दिनानिमित्त संपूर्ण भारतात 100 प्रेरणादायी कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडला आहे. या संकल्पचा शुभारंभ एक नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे मुंबईच्या जीवन संजीवनीचे संचालक सांगलीचे सुपुत्र व राष्ट्रीय वक्ते डॉ. राजेश चव्हाण जळगावचे मिशन आयएएसचे विभागीय संचालक श्री एजाज शेख हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून ठिकठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देणार आहेत.
महाराष्ट्राचे मा. राज्यपाल व सर्व विद्यापीठे व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना रितसर पत्र पाठवून या उपक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच मा. राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठात राबविण्यासाठी एक रितसर पत्र काढण्याची विनंतीही डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी मा. राज्यपालांना केली आहे. ज्यांना आपल्या संस्थेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करायचे आहे त्यासाठी त्यांनी संपर्कासाठी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला अनुकूल प्रचंड प्रतिसाद प्राप्त होईल असा आशावादही या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीने घेतलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
