You are currently viewing गल्ली ते दिल्ली मनीष गवई 

गल्ली ते दिल्ली मनीष गवई 

 

दिल्लीला गेल्यावर माझ्या हक्काचा माणूस म्हणजे माझा माजी विद्यार्थी मनीष गवई. अमरावतीच्या विलासनगराच्या गल्लीतून त्याने जी उंच भरारी घेतली ती एकदम दिल्लीमध्येच.

दिल्लीमध्ये मनोजचे चांगले प्रस्थ आहे. केंद्रीय श्री रामदास आठवले यांच्याकडे राहून मनीषने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून घेतलेला आहे. मनीष दिल्लीला तुमच्या मदतीला ताबडतोब धावून येणारा माणूस आहे. माझी तर त्याची चांगली ओळख आहेच तो माझ्या मदतीला येतोच .पण काल-परवा म्हणजे 10 जूनला मी त्याला माझ्या एका मित्रासाठी फोन केला. त्या मित्राची मुंबईवरून दिल्लीला बदली झाली आहे .त्याला निवासाची व्यवस्था पाहिजे होती .तो सध्या महाराष्ट्र सदनमध्ये थांबलेला आहे. पण महाराष्ट्र सदनाच्या नियमानुसार तिथे दीर्घकाळ राहता येत नाही. त्या माझ्या मित्रांनी मला फोन केला .मी मनीषला फोन केला. मनीष म्हणाला सर काही काळजी नका करू .त्याची व्यवस्था होईपर्यंत तो माझ्या फ्लॅटमध्ये राहील.

 

ज्याला त्याने पाहिले नाही तो कोण्या पदावर काम करीत आहे हे त्याला माहीत नाही. पण काठोळे सरांचा फोन आला तर तो चांगल्याच माणसासाठी आला असेल असे समजून मनीषने आपल्या फ्लॅटची दरवाजे त्या अनोळखी माणसासाठी मोकळी करून दिलेली आहेत. यातच मनीषच्या मनाचा मोठेपणा आहे.

 

मी दिल्लीला आयएएस विद्यार्थ्याच्या सत्काराला गेलो होतो. माझ्याबरोबर मोठा समुदाय होता. सोबत माजी मंत्री श्री गुलाबराव गावंडे हे होते .त्यामुळे त्यांचे चिरंजीव श्री संग्राम गावंडे यांनी आमची व्यवस्था केली होती. पण श्री गुलाबराव गावंडे साहेब निघून गेल्यानंतर आमची अडचण होणार होती. मनीषला फोन केला .मनीष लगेच आला. मी त्याला वस्तुस्थिती सांगितली. त्यावर तो म्हणाला. सर काही काळजी नका करू. मी आहे ना. आणि श्री गुलाबराव गावंडे गेल्यानंतरही महाराष्ट्र शासन मध्ये राहण्याची त्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली.

 

परवा मला आमचे जिवलग मित्र व खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्याकडे जायचे होते. मी महाराष्ट्र सदनलाच होतो. मनीष ला म्हटले मनीष टॅक्सी बोलव. आपण खासदार डॉ.अनिल बोंडे साहेबांना भेटायला जाऊ. त्यावर मनीष म्हणाला सर माझी गाडी आहे ना. मला त्याला त्रास देणे योग्य वाटले नाही .मी म्हटलं .तुझी गाडी राहू दे .आपण टॅक्सीने जाऊ. तो म्हणाला सर माझी गाडी असताना तुम्ही टॅक्सीने जाणे मला प्रशस्त वाटत नाही आणि तो मला घेऊन त्याच्या गाडीकडे वळला.

 

खरं म्हणजे पुण्या मुंबई सारख्या दिल्ली सारख्या शहरांमध्ये लोकांना वेळ नसतो. हे स्वतःच्या कुटुंबालाच वेळ देऊ शकत नाही .तर इतरांना कसा देणार ? पण मनीष मात्र याला अपवाद आहे .मी जेव्हा जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा तेव्हा मनीष माझ्या दिमतीला असतो. अगदी महाराष्ट्र सदन पासून रेल्वे स्टेशन पर्यंत किंवा विमानतळापर्यंत तो मला सोबत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे की माझ्या खिशाला कात्री लागू देत नाही. तो म्हणतो सर तुम्ही मला आदरणीय आहात .तुमचे आदरतिथ्य करणे हे मला समाधान देऊन जाते.

 

मनीष माझा विद्यार्थी दशेतील मित्र. त्याची जडणघडण आमच्या समोरच होत होती. माझी कन्या पल्लवी त्याच्याच मित्र-मैत्रिणीच्या परिवारात वावरत होती. राष्ट्रीय सेवा योजना युवा जागर मी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय या सर्व माध्यमातून तो सदा सर्वदा लोकांसमोर राहत होता आणि आजही आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाटकावरील पथनाट्यावरील एकपात्री प्रयोगावरील त्याने जेवढे प्रयोग केले तेवढे क्वचितच कोणीतरी केले असतील .प्रवास खर्चाची अपेक्षा नाही .मानधनाची अपेक्षा नाही गाडीची अपेक्षा नाही .दिले तरी ठीक .नाही दिले तरी ठीक. या भावनेने तो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खेड्यापाड्यात ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागांमध्ये पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होता आणि आजही करीत आहे .

 

मनीष अमरावतीला आला की त्याच्या व्यस्त कार्यक्रमातून आठवणीने घरी येतो. मग आमच्या चळवळीच्या गप्पा रंगतात .दिल्लीला गेलो तर तो विज्ञानभवनातल्या एखाद्या कार्यक्रमात घेऊन जातो. विज्ञान भवनातील सुरक्षा अतिशय कडक .पण त्या खडक सुरक्षा व्यवस्थेला तडा न जाता हा रितसर माझ्यासाठी पास काढतो आणि मला घेऊन जातो. अनेक वेळा कार्यक्रमाला आय ए एस आयपीएस अधिकारी असतात. तसेच मंत्री केंद्रीय मंत्री असतात .मनीष बेधडक स्टेजवर जातो आणि त्यांचा माझा परिचय करून देतो

 

परवा दिल्लीला गेलो. तर मनीष म्हणाला. चला जेवण करायला जाऊ .मला असं वाटलं की हा कुठेतरी हॉटेलमध्ये घेऊन जाईल. तर त्याची गाडी थांबली ती केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांच्या निवासस्थानासमोर. मी बंगल्यावरची पाटी पाहून मनीष ला म्हटले .इथे .तो म्हणाला हो आपल्याला रामदास आठवले साहेबांकडे जेवण करायचे आहे. मी त्याला म्हटले अरे असे अनाहूतपणे जाणे बरे आहे का ? तो म्हणाला तुम्ही त्याची काळजी नका करू. तो मला थेट आतमध्ये घेऊन गेला. डायरेक्ट केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवलेंकडे आणि त्यांच्यासमोर मला उभा करून त्याने माझ्या कार्याचा पाढा वाचला . श्री रामदास आठवलेंना मी डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी मध्ये निमंत्रण दिले होते .त्याची त्यांना आठवण झाली. त्यांनी लगेच त्यांच्या स्वीय सहाय्यकाला म्हटले

अरे एक शाल घे .एक मोमेंटो घे. मला या साहेबांचा सत्कार करायचा आहे. हे खूप मोठे काम करीत आहेत .पीए ने मोमेंटो आणला. शाल आणली. आणि रामदास आठवले यांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर माझा सत्कार केला. आणि ते म्हणाले सर मी गडबडीत आहे आणि मनीषला म्हणाले मनीष यांच्या जेवणाची व्यवस्था कर आणि जेवण केल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ नका .अशी विनंती ही त्यांनी मला केली. आम्ही त्या दिवशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे कळे जेवण केले आणि परत आलो .

 

परवा ज्येष्ठ सनदी अधिकारी पासपोर्ट में म्हणून परिचित असलेले श्री ज्ञानेश्वर मुळे यांनी नव्याने आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार दिल्लीला ठेवलेला होता. मला त्या कार्यक्रमाला जायचे होते. मी मनीषला कळवले की तो म्हणाला डायरेक्ट महाराष्ट्र सदन मध्ये या .मी म्हटले अरे मी आरक्षण केलेलं नाही. तो म्हणाला. त्याची काळजी करू नका. मी ती व्यवस्था करतो. मला महाराष्ट्र सदनमध्ये थांबविणे .पुढचे पाऊल कार्यक्रमाला घेऊन जाणे .परत विमानतळावर सोडून देणे .ही सगळी कामे मनीषने केली

. त्यात त्याचा किती वेळ गेला असेल तर त्यालाच माहीत .पण त्याने सेवाभावाने हे सगळे केले. मला गाडीमध्ये पेट्रोल देखील टाकू दिले नाही.

 

काही माणसे मोठी असतात. पण त्यांची मन मोठी नसतात. काही माणसे आम्ही घडविलेली असतात .पण विचाराने ते मोठी नसतात. मोठे झाल्यावर ते विसरतात .मनीष मात्र याला अपवाद आहे. प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की तो जसा मला पहिल्या भेटीत भेटला तसाच आजही तो भेटतो .तो आता केंद्रीय मंत्र्याबरोबर राहतो. खासदारांबरोबर राहतो. मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर राहतो .परंतु तो या अमरावतीच्या मातीला विसरला नाही आणि विसरणे शक्यही नाही .जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो अमरावतीला येतो. मिळेल त्या वाहनाने येतो आणि मित्रांना भेटतो. नातेवाईकांना भेटतो .गुरुजनांना भेटतो आणि आपली कृतज्ञता व्यक्त करतो. ही कृतज्ञता व्यक्त करणे अनन्यसाधारण बाब आहे. प्रत्येकाला हे जमेल असे नाही. पण मनीषला ते जमलेले आहे. त्यामुळे मनिषचे जेवढे वर्णन करावे तेवढे शब्दातीतच आहे.

 

मनीषचा 14 जूनला वाढदिवस असतो .मागच्या वाढदिवसाला मी आणि मातोश्री लेडी गव्हर्नर कमलताई गवई गेलो होतो. सर्वात महत्त्वाचे की मनीष सर्वांची दखल घेतो. कोणाला बेदखल करीत नाही .त्यामुळे मनीषचे निमंत्रण नसले की मला तिथे जावसे वाटते .तो केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचे ज्या थाटात स्वागत करेल त्याच थाटात त्याच आत्म्यियतेनने त्याच आंतरिक ओढीने आमचेही स्वागत करतो. त्यामुळे त्याचे निमंत्रण आले की आमची पावले नकळत त्याच्या कार्यक्रमाकडे वळतात. तो योग आता या 14 तारखेला आला आहे .मनीष सारखे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे कार्यकर्ते लोकांमध्ये जनजागृती करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. पंजाबराव देशमुख श्री संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार घराघरात पोहोचणारे निर्माण झाले पाहिजे अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि शब्दांना विराम देतो.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा