You are currently viewing सावंतवाडी-बेंगळुरू दररोज आंतरराज्य एसटी सेवा सुरू करा

सावंतवाडी-बेंगळुरू दररोज आंतरराज्य एसटी सेवा सुरू करा

सावंतवाडी-बेंगळुरू दररोज आंतरराज्य एसटी सेवा सुरू करा

आमदार दीपक केसरकर यांचे परिवहनमंत्र्यांना निवेदन; *कोकणातील* *प्रवाशांना होणार मोठा फायदा*

दोडामार्ग : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तसेच जिल्ह्याच्या इतर भागातील नागरिकांना कर्नाटकातील बेंगळुरू येथे प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ते बेंगळुरू आणि बेंगळुरू ते सावंतवाडी अशी दररोज आंतरराज्य एसटी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची मागणी कळणे येथील संदेश देसाई यांनी आमसभेत केली होती अशी माहिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी दिली.

सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी नोकरी, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच पर्यटनाच्या निमित्ताने कर्नाटकातील बेंगळुरू परिसरात ये-जा करतात. मात्र, सावंतवाडीहून बेंगळुरूला थेट रेल्वे किंवा एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना गोवा किंवा कर्नाटकातील अन्य मार्गांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे जाण्यासाठी सांध्याकाळच्या वेळेत आंतरराज्य एसटी सेवा सुरू केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठी सोय होईल, असे आमदार केसरकर यांनी म्हटले आहे. या बससेवेमुळे प्रवाशांना थेट बेंगळुरू गाठता येणार असून, एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असून, येथील आंबोली, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, शिरोडा यांसारख्या पर्यटनस्थळांना कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. दररोज थेट एसटी सेवा सुरू झाल्यास कर्नाटकातील पर्यटकांना सिंधुदुर्गात येण्यासाठीही अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या बससेवेमुळे आंबोली, वेंगुर्ला, धारवाड, कुणकेरी, हावरी, वागणेरे, पिंगुळी, कुडाळ आदी भागांतील प्रवाशांनाही फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सावंतवाडी-बेंगळुरू आणि बेंगळुरू-सावंतवाडी अशी दररोज आंतरराज्य एसटी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सहकार्य करावे, अशी विनंती आमदार दीपक केसरकर यांनी परिवहनमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता परिवहन विभागाकडून या मागणीवर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा