सिंधुदुर्ग-कोल्हापुरातील ३० विद्यार्थ्याना उमेद फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्राप्त…

सिंधुदुर्ग-कोल्हापुरातील ३० विद्यार्थ्याना उमेद फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्राप्त…

सिंधुदुर्ग

उमेद फाउंडेशनने निश्चल इसरानी फाउंडेशनच्या मदतीने हुशार व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता शिष्यवृत्ती मोहीम राबवण्यात आली होती. उमेद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या कडून १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. २५० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती करता अर्ज केले होते. त्यापैकी तीस विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रतिकुल परिस्थिती यांची पाहणी करून निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली व वैभववाडी या तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेद शिष्यवृत्ती धनादेश वितरित करण्यात आलेत. देवगड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांना नाना सारंग व देवगड उमेदियन यांच्या हस्ते, सावंतवाडी येथील तीन विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे, माजी सरपंच मंदार कल्याणकर, राजेश विरर्नोडकर, राकेश केसरकर, सर्वेश गोवेकर, जे. डी. पाटील, स्वाती पाटील व सावंतवाडी उमेदियन यांच्या हस्ते, कणकवली येथील २ विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे व कणकवली उमेदियन यांच्या हस्ते, मालवण येथे एका विद्यार्थ्यांला उमेदियन शशिकांत पाटील यांच्या हस्ते, वैभववाडी येथील ३ विद्यार्थ्यांना दिनकर केळकर व वैभववाडी उमेदियन यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
उमेद फौंडेशन गेली सहा वर्षे महाराष्ट्रभर गरजू व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था म्हणून सुप्रसिद्ध आहे. उमेद फौंडेशनच्या सदर कार्यक्रमासाठी उमेद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे, प्रकाश म्हेत्तर, अमर नाळे, शशिकांत पाटील, युवराज पचकर, सागर पेंडूरकर, नितिन पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप नाळे, राजेंद्र रामचंद्र पाटील हे उपस्थित होते. उमेद फाऊंडेशनच्या वतीने गरजू मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा