You are currently viewing खड्डा चुकवताना क्रेटा दुभाजकावर आदळली; महिला २० फूट उंच उडून रस्त्यावर

खड्डा चुकवताना क्रेटा दुभाजकावर आदळली; महिला २० फूट उंच उडून रस्त्यावर

खड्डा चुकवताना क्रेटा दुभाजकावर आदळली; महिला २० फूट उंच उडून रस्त्यावर

इन्सुली कोठावळेबांध येथे भीषण अपघात; महिलेसह चौघे जखमी, ग्रामस्थांचे तातडीने बचावकार्य

बांदा

मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कोठावळेबांध येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे गुरुवारी भीषण अपघात झाला. दीव-दमण येथून गोव्याच्या दिशेने जाणारी भरधाव क्रेटा कार महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित होऊन थेट दुभाजकावर आदळली.
धडक इतकी जोरदार होती की कार विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. अपघाताच्या तीव्रतेमुळे कारचा दरवाजा उघडून आत बसलेली महिला तब्बल २० फूट उंच उडून रस्त्यावर फेकली गेली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून कारमधील अन्य तीन प्रवासीही जखमी झाले आहेत.
खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा स्थानिकांचा दावा
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, कोठावळेबांध परिसरातील महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याच खड्ड्यांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
ग्रामस्थांचे प्रसंगावधान; जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर मोरजकर, लक्ष्मण पाटील, देवेन कासकर, प्रशांत वारंग, आपा आमडोसकर, ओमकार मोरजकर, उमेश मोरजकर, मंजू नायर, नलू मोरजकर, अभिजित कोठावळे आणि तुषार तोरसकर यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर उपलब्ध वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी
मुंबई-गोवा महामार्गावरील कोठावळेबांध परिसरातील खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या ठिकाणची रस्त्याची दुरुस्ती करून जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा