‘सुलेखन हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा’; वेंगुर्ल्यात देवनागरी सुलेखन कार्यशाळा उत्साहात
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात चार दिवसीय कार्यशाळा; २० जणांचा सहभाग
वेंगुर्ला
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आणि श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय देवनागरी सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा. सुनील नांदोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. धनश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. सुनील नांदोसकर, डॉ. मनीषा मुजुमदार, सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सुलेखनातील बारकाव्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
मार्गदर्शन करताना प्रा. सुनील नांदोसकर यांनी सुलेखन ही सुंदर व सर्जनशील कला असून ती आत्मसात करण्यासारखी असल्याचे सांगितले. हस्ताक्षर आणि सुलेखन या दोन स्वतंत्र संकल्पना असून सुलेखनामध्ये अक्षरांचे सौंदर्य, प्रमाणबद्धता, रचना, वळण आणि मांडणी यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चार दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्ट्रोक, अक्षरांची ठेवण व रचना, देवनागरी अक्षरलेखन, अक्षरांमधील प्रमाणबद्धता तसेच लेखनातील सौंदर्य व कलात्मकता यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सैद्धांतिक माहितीबरोबरच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. त्यांच्या लेखनातील त्रुटी दूर करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनही करण्यात आले.
देवनागरी व इंग्रजी सुलेखनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रा. सुनील नांदोसकर यांनी देवनागरी तसेच इंग्रजी सुलेखनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. अक्षरांची रचना, शब्दांची मांडणी, लेखनातील समतोल आणि सौंदर्य याबाबत विविध उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रकारच्या अक्षरलेखनाचा सराव केला.
“सुलेखन व्यक्तिमत्त्वाचा आरसा”
डॉ. मनीषा मुजुमदार यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, डिजिटल माध्यमांचा वाढता वापर झाल्यामुळे सुंदर हस्ताक्षर व सुलेखन कलेचे महत्त्व काहीसे मागे पडत आहे. सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन हे केवळ अक्षरांचा आकार नसून व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. या कलेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी, एकाग्रता आणि सर्जनशीलता विकसित होते. लोप पावत चाललेल्या या कलेला नव्याने प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुलेखनामुळे एकाग्रता, संयम आणि सर्जनशीलता वाढते
समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी सुलेखनामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी मदत होत असल्याचे सांगितले. एकाग्रता, संयम, शिस्त, सातत्य आणि सर्जनशीलता यांसारख्या गुणांच्या विकासासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
समारोपप्रसंगी तन्मय शितोळे, सारा प्रभू, प्रा. सुरेखा धुरी, प्रीती वाडकर, केतकी वेंगुर्लेकर, उल्हास सामंत आणि स्वराज्य गायकवाड यांनी कार्यशाळेतील अनुभव व्यक्त केले. प्रत्यक्ष सरावामुळे अक्षरलेखनातील आत्मविश्वास वाढला असून सुलेखनातील बारकावे, शास्त्र आणि कलात्मकता समजून घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
चार दिवसीय कार्यशाळेत एकूण २० जणांनी सहभाग घेतला. लोप पावत चाललेल्या सुंदर हस्ताक्षर व सुलेखन कलेला प्रोत्साहन देणारी ही कार्यशाळा सहभागींसाठी मार्गदर्शक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली.
समारोपप्रसंगी डॉ. बी. जी. गायकवाड यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर डॉ. मनीषा मुजुमदार यांनी आभार मानले.
