विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
स्वच्छ सर्वेक्षण २०२६ व माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ विटा शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गतिमान करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे यांनी दैनंदिन स्वच्छतेसोबतच शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र फिरते पथक कार्यरत केले आहे. या पथकाच्या माध्यमातून दररोज दहा किंवा त्याहून अधिक सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन स्वच्छता केली जात आहे.
या विशेष पथकामध्ये नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, IEC विभाग तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथक शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ठिकाणांचा शोध घेते. आवश्यकतेनुसार संबंधितांना सूचना व नोटीस देऊन नियमांनुसार कारवाई केली जाते. त्याचवेळी परिसरातील कचरा गोळा करून घंटागाडीच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाते आणि संबंधित परिसर स्वच्छ केला जातो.
या उपक्रमांतर्गत आज शाळा क्र. १, नवी भाजी मंडई बाजार पटांगण, जयभवानी अपार्टमेंट मायणी रोड, अनुराज हॉस्पिटलजवळ सावरकर नगर, गणेश पेठ, गांधी चौक, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर, उभी पेठ, आडवी पेठ, ब्राह्मण गल्ली आदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
“विटा शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणे ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान केवळ काही दिवसांपुरते मर्यादित न ठेवता नियमित स्वच्छतेची सवय नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये यासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून दररोज विविध भागांची पाहणी व स्वच्छता केली जात आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता नगरपरिषदेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करावा आणि विटा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे.” असे आवाहन आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळेयांनी केले.
या विशेष स्वच्छता पथकात प्रभारी आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे, मुकादम अर्जुन सूर्यवंशी, दीपक सातपुते, श्रीकांत साठे, स्वच्छतादूत शिराज शिकलगार, नितीन चंदनशिवे, समीर बागवान, सुरज मंडले, महेश झाडे, प्रमोद भोसले, साक्षी जाधव, विजय चंदनशिवे, शुभम मोहिते, सागर कांबळे आदींचा सहभाग आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून विटा शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे कामही सातत्याने सुरू आहे.
