You are currently viewing शासन आदेशांना हरताळ; शाळांमध्ये बेकायदेशीर वह्या विक्रीचा आरोप

शासन आदेशांना हरताळ; शाळांमध्ये बेकायदेशीर वह्या विक्रीचा आरोप

शासन आदेशांना हरताळ; शाळांमध्ये बेकायदेशीर वह्या विक्रीचा आरोप

“कारवाई होईपर्यंत लढा सुरूच” ; सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचा इशारा

सावंतवाडी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर रित्या वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेने केला आहे. अनुदानित तसेच सीबीएसई (CBSE) मंडळाच्या शाळांकडून पालकांना साहित्य खरेदीची सक्ती केली जात असून, संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर यांनी केली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कराड येथे सुरू असलेल्या स्टेशनरी विक्रेत्यांच्या उपोषणाला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पुरुषोत्तम कुडतरकर म्हणाले, “शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचा वह्या-पुस्तकांचा व्यापार चालणार नाही, असा स्पष्ट शासन आदेश आहे. शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांचे आदेश असतानाही काही शाळांनी थेट दुकानेच सुरू केली आहेत. हा नियमांचा उघड भंग आहे. हा लढा आमच्या पोटापाण्यासाठी असून, जर शिक्षण संस्थाच शासन आदेश पाळत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करणार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

या संदर्भात येत्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईशकुमार केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळांमधील प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला. “काही घाटमाथ्यावरील शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्येही वह्या विक्रीचा व्यवसाय करत असून विद्यार्थ्यांना वह्या घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. शिक्षकांनी केवळ विद्यादानाचे काम करावे, धंदा करू नये. आम्ही अधिकृत विक्रेते असून सरकारला कर भरतो, त्यामुळे आमच्या पोटावर पाय आणू नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कराड येथील स्टेशनरी विक्रेत्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही विक्रेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग स्टेशनरी संघटनेचे अध्यक्ष साईशकुमार केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नित्यानंद कोरगावकर, राज्य कमिटी सदस्य पुरुषोत्तम कुडतरकर यांच्यासह सोहम पेडणेकर, शेखर पेडणेकर, प्रवीण आईर, सुनील केसरकर, अण्णा मठकर, संदीप सावंत, प्रसाद माधव, ऋतिक कोरगावकर, दीपक सावंत, बाळकृष्ण पेडणेकर, समीर घाडीगांवकर, नारायण नाईक आदी स्टेशनरी व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा