You are currently viewing मुंबईत तीन दिवस शहर, पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबईत तीन दिवस शहर, पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

*मुंबईत तीन दिवस शहर, पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात*

*ठाणे-कोपरी पुलाच्या कामात जलवाहिनी फुटली*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरी पुलाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारी ठाणे येथील जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ मार्चदरम्यान शहर व पूर्व उपनगरात तीन दिवस १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तरीही शहर व पूर्व उपनगरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका १२० किलोमीटर दूर ठाणे जिल्हा व परिसरातून पाणीपुरवठा होतो. यापैकी भातसा धरणातून पाणीपुरवठा करणारी २३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई- २’ या जलवाहिनीला कोपरी पुलाच्या कामात धक्का लागल्याने मोठी गळती लागली आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून मुंबई शहर आणि पूर्व उपनगराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून तातडीने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत शहर व पूर्व उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कालावधीत मुंबईकरांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*ठाणे पालिकेकडून खर्च वसूल करणार!*

कोपरी पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या आणि भातसा धरणातून येणाऱ्या मोठ्या पाइपलाइन पुलाचे काम करताना धक्का लागल्यामुळे ही गळती सुरू झाली आहे. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने या ठिकाणचे काम थांबवले, अन्यथा मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असता. दरम्यान, पुढील दिवसांत होळी असल्याने संपूर्ण पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी ९ मार्चपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हा खर्च मुंबई महानगरपलिकेला अनाठायी करावा लागणार आहे. त्यामुळे काम झाल्यानंतर संपूर्ण खर्च ठाणे महापालिकेकडून वसूल करण्यात येणार आहे. तसे पत्र ठाणे महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुख्य जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.

*या भागातल्या नागरिकांनी दक्ष रहावे*

*पूर्व उपनगर*

टी विभाग – मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एस विभाग भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी (पूर्व)

एन विभाग – विक्रोळी (पूर्व), घाटकोपर (पूर्व) आणि (पश्चिम)

एल विभाग कुर्ला (पूर्व)

एम / पूर्व-पश्चिम विभाग – चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द

*शहर विभाग*

ए विभाग फोर्ट बीपीटी व नौदल परिसर

बी विभाग – मोहमद अली रोड, डोंगरी, सँडहर्स्ट रोड

ई विभाग संपूर्ण भायखळा विभाग

एफ/दक्षिण विभाग परळ, एल्फिन्स्टन

एफ / उत्तर विभाग शीव, किंग सर्कल, माहीम

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 7 =