You are currently viewing फ्रेंच आणि माधवराव पेशवे

फ्रेंच आणि माधवराव पेशवे

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

संभाजी पुत्र शाहू महाराज गेल्यानंतर मराठा राजकारण हे षड्यंत्राच्या खाईमध्ये बुडाले, शेवटी १८१८ मध्ये अस्त पावले. दुर्दैवाने मराठा साम्राज्याने सुद्धा इंग्रजांना मोठे करून स्वतःला छोटे केले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, स्वराज्याची भूक बाळगून असंख्य मावळ्यांनी आपले बलिदान या मातीसाठी दिले. ते केवळ आपापसात विरोध करून मराठ्यांनी संपवले आणि इंग्रजांनी या धरतीवर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. माधवराव पेशव्यानंतर पेशवाईमध्ये रणकंदन माजले. नारायण रावचा खून करून राघोबा पेशवे झाले व तिथूनच स्वार्थाचा परमार्थ करण्यासाठी शिवरायांनी निर्माण केलेले राज्य संपूवून टाकण्यात आले.

त्या काळामध्ये पूर्ण देशात मराठा साम्राज्याचा गौरव होता. पानिपतमध्ये जे गमावले ते माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा कमावले व परत पूर्ण भारतावर मराठ्यांचे राज्य प्रस्थापित झाले. इंग्रज जर कोणाला भीत होते तर ते फक्त मराठ्यांना भीत होते. म्हणूनच फ्रान्सने देखील मराठ्यांच्या शौर्याचा डंका पूर्ण जगामध्ये वाजवला होता. त्या काळामध्ये जगामध्ये अनेक संघर्ष एकाच वेळी चालू होते. बहुतेक सर्व संघर्ष इंग्रजांविरुद्ध होते. १६४९ ला शिवराय १९ वर्षाचे होते, त्यावेळेस इंग्लंडमध्ये प्रचंड क्रांती झाली. इंग्लंडचा राजा चार्ल्स याला लोकसभेने लंडनच्या रस्त्यावर फाशी पुकारून सुळावर चढवले आणि राजेशाही नष्ट करण्यात आली. प्रतिक्रांतीमुळे राजेशाही पुढे जाऊन पुन्हा इंग्लंडमध्ये प्रस्थापित झाली. पण या इंग्लंडच्या राजकारणावरून छत्रपती शिवरायांनी प्रचंड बोध घेतला. म्हणूनच त्यांनी जे राज्य निर्माण केले ते स्वराज्य म्हणून निर्माण केले, रयतेचे राज्य निर्माण केले. रयतेच्या कल्याणासाठी राज्य निर्माण केले. स्वतः संपत्ती प्रसिद्धी आणि स्वार्थ साधण्यासाठी राज्य निर्माण केले नाही. पण छत्रपती शिवरायांना इंग्रजांचा नेहमीच संशय येत होता. कारण स्वार्थांनी पेटलेले इंग्रज ‘तोडा, फोडा आणि राज्य करा.’ हे धोरण कायम राबवत होते. भारतात जी जी शक्ती होती तिला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी इंग्रजांनी अतिशय छोट्या सैन्यांनी मोठे प्रयत्न केले. शिवरायांच्या काळात त्यांनी फार हालचाल केली नाही, पण हे इंग्रज औरंगजेबाचे हस्तकच होते.

अमेरिकेचा जेव्हा शोध लागला, त्यावेळी जगातील अनेक राष्ट्राचे लोक अमेरिकेकडे धावू लागले. जगामध्ये जिथे उपासमारीने लोक मरत होते जसे की आयर्लंड, जगातले कैदी हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने सुटल्यावर अमेरिकेकडे धावले. मूळ अमेरिकन रहिवाशांची कत्तल करून अमेरिकेतली जमीन अनेक देशातील लोकांनी हडप केली. राष्ट्र घडवले. पहिली लोकशाही म्हणून प्रसिद्ध झाली. संविधानावर आधारित राजकारभार चालू लागला. जगाला लिखित संविधान दिले. पुढे चालून जगातील अनेक राष्ट्र अमेरिकन लोकशाहीवर उभी राहिली. भारतासारखी काही राष्ट्रांनी लोकशाही पद्धत स्विकारली. अमेरिकेने इंग्रजांच्या राजवटीला झुगारून एक प्रचंड स्वतंत्र लढा दिला. त्यात फ्रान्सने स्वतंत्र सैनिकांना मदत केली. त्यामुळे फ्रान्स कंगाल झाला. म्हणून जगभरात फ्रान्सला आपले सैन्य ठेवता आले नाही. त्यातला एक देश म्हणजे भारत.

या दरम्यान भारतात १७५० पासून प्रचंड उलथापालथ होऊ लागली. त्यात एक फ्रेंच अधिकाऱ्याचं जीवन चरित्र आपल्याला आकर्षक वाटते. त्याचे नाव जिन लॉ (Jean Law), इंग्रजाच्या बरोबर संघर्षामध्ये नेहमी आघाडीवर राहिला. त्यांनी सुरुवात आल गोहर किंवा शहा आलम २ बरोबर काम केले. हा नंतर मोघलांचा बादशहा झाला. लॉ आपली माणसे घेऊन त्याच्याबरोबर लढला. शहाआलमचा इंग्रजांकडून ३ वेळा पराभव झाला. त्यात १५ जानेवारी १७६१ मध्ये लॉ ला कैद करण्यात आले. हे ऐकून इंग्रज अधिकारी मेजर कर्नाक तिकडे गेला. तो म्हणाला “तू एक शूर शिपाई आहेस. पण आता इंग्रजांना विरोध करणं बंद कर. इतिहास तुझं नाव नक्की घेईल. पण आता कमरेचा पट्टा काढ आणि तुझी तलवार शरणा दाखल दे.” लॉ म्हणाला की, “माझा शरणागती पत्करण्यास काही विरोध नाही मी शरण येतो. पण तलवार देऊन शरणागती पत्करणे म्हणजे माझी प्रचंड बदनामी होण्यासारख आहे. मी असे कधीच करणार नाही. मग तुम्ही माझा प्राण घेतला तरी चालेल.” त्या इंग्लिश कमांडरने लॉचे शौर्य बघून त्याला त्याची तलवार ठेवू दिली. या कृत्याबद्दल फ्रान्सच्या राजाने त्यांचे कौतुक केले व त्याला गडोत्री देऊन कर्नल केले. इंग्लंड बरोबर शांती करार झाल्यावर फ्रेंच राजाने लॉला भारतामध्ये परत पाठवले व त्याला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आले. लॉ पाँडिचरीला आले, तिथे फ्रांसची मुख्य राजधानी होती, पण ती ११ एप्रिल १७६५ साली इंग्रजांनी उद्ध्वस्त केली होती. तोपर्यंत इंग्रज हे दक्षिण भारताचे राजे झाले होते. बक्सारच्या लढाईनंतर २३ ऑक्टोबर १७६४ ला इंग्रजांनी बंगाल मध्ये सुद्धा ताबा बनवला. लॉ हा प्रचंड अडचणीत आला होता आणि त्यातच हैदरअलीने १७६७ मध्ये इंग्रजांविरुद्ध युद्ध छेडले. हैदरअली आणि नंतर टिपू सुलतान हे फ्रेंच लोकांचे मित्र होता. हैदरने फ्रांसची मदत मागितली. पण लॉ ने दिली नाही. त्यातच पाँडिचरी मध्ये बऱ्याच तरुण लोकांना ही संधी दिसली इंग्रजांविरुद्ध लढण्याची, पण फ्रान्सला इंग्लंड विरुद्ध यावेळेला लढा करायचा नव्हता. त्यात हैदरअलीचा विजय झाला. फ्रेंच मंत्री duc the choiseul याने हैदरअलीकडे राजदूत पाठवला. त्याचवेळी हैदरअलीचे मराठ्यांबरोबर युद्ध सुरू होते. लॉला माहित होतं की भारतामध्ये सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणजे मराठा साम्राज्य आहे आणि इंग्रज फक्त मराठ्यांना घाबरतात. पण जर इंग्रजांना कळलं की फ्रेंच हे हैदरअलीला मदत करत आहेत तर इंग्रज हे मराठ्यांच्या विरुद्ध जातील. फ्रेंच सरकारला लॉने ताबडतोब एक पत्र पाठवलं त्याच्यामध्ये म्हटले की भारतामध्ये मराठे हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची शक्ती वाढत चालली आहे. त्यामुळे मराठे एक दिवस मोघलांना नष्ट करू शकतील आणि पूर्ण भारतावर मराठ्यांचे राज्य स्थापन होईल. म्हणून फ्रान्सने मराठ्यांच्या विरोधात युद्ध छेडलं तर फ्रान्सला फार महागात पडेल.

१९ मार्च १७७२ साली लॉने परत एक पत्र फ्रान्स सरकारला पाठवले. त्यामध्ये माधवराव पेशव्यांच्या पत्राला अनुसरून एक प्रस्ताव फ्रान्स सरकारला पाठवला. त्यात माधवराव पेशव्यांनी फ्रान्स बरोबर तह करून इंग्रजाविरुद्ध लढण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव लॉने फ्रान्स सरकारकडे पाठवला. फ्रान्सने मराठ्यांचा आधार घेऊन त्यांच्या संरक्षणाखाली फ्रेंच लोकांना ठेवले पाहिजे. फ्रान्स हा मराठ्यांचा मित्र आहे आणि जर का फ्रांसला दगा दिला तर मराठे ते सहन करणार नाहीत आणि जर का फ्रेंच लोकांना हानी झाली तर मराठी सूड उगवतील. याच पत्रात माधवराव पेशव्यांचे लिहिलेले पत्र सुद्धा आहे. यात माधवरांवाची दूरदृष्टी दिसते. त्यावेळी दहा हजार फ्रेंच सैनिक भारतात होते आणि इंग्रजांना ते सरळपणे शह देऊ शकले असते. भारताच्या दुर्दैवाने माधवरावांचा अकाली मृत्यू झाला, या देशाला एक सर्वात मोठी संधी मिळाली होती. ती नष्ट झाली. मराठ्यांचा हा तह माधवरावांची विद्वत्ता दाखवतो. पानिपतच्या युद्धानंतर सगळ्यात मोठं अरिष्ट होते. ह्या तहाबाबत पाँडिचरी मधील फ्रेंच कौन्सिल मध्ये चर्चा झाली. कौन्सिलने माधवरावचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरवले व लॉने लगेच फ्रान्स सरकारला हा प्रस्ताव शिफारस करून पाठवला. पण फ्रांसचा राजा आणि सगळे मंत्री यांची राजकारणावर काहीची पकड नव्हती. राजा फक्त विलासी जीवन जगत होता, फ्रांस क्रांतीकडे ओढला जात होता. लॉला काही सरकार कडून उत्तरच मिळाले नाही. माधवराव १८ नोव्हेंबर १७७२ ला अचानकपणे ही पृथ्वी सोडून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड प्रमाणात गोंधळ होता, त्यातून फक्त हैदरअलीला फायदा झाला. पण १७७४ पर्यंत लॉला फार आशा होती की हे सर्व मराठे एकत्र होतील. त्यानंतर नारायणराव पेशवा झाले. त्यांनी परत फ्रेंच लोकांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आणि नारायणराव कर्नाटक वर स्वारी करायचा विचार करत होता आणि मधावरावांनी केलेला प्रस्ताव त्यांना माहीत होता. राघोबांनी नारायण रावांची हत्या केली आणि पेशवे झाले. राघोबांना देखील फ्रांस बरोबर मैत्री करायची होती. पण त्यांना पळून जावे लागले आणि इंग्रजांची मदत घ्यावी लागली. पुढे या दुफळीचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि पेशव्यांचा नायनाट केला. शेवटी १८१८ मध्ये भारत गुलाम झाला. लॉची खात्री होती की फ्रान्स आणि मराठे इंग्रजांना भारताच्या बाहेर हाकलून देऊ शकतात. अशाप्रकारे लॉने मोठा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही आणि म्हणून इंग्रज भारतात स्थिरावले आणि भारताला गुलाम केले. हे टाळता आले असते तर भारत विकासाच्या शिखरावर आज असता. कारण शेवटी कोणाला किती इंग्रजाबद्दल प्रेम असले तरी इंग्रजांनी भारताला लुटून फस्त केले व उभ्या रयतेला दारिद्रयात ढकलून गेले होते. ते आपल्याला टाळता आले असते जर लॉचा मुत्सद्दीपणा आणि माधवरांवाची दूरदृष्टी एकत्र आली असती.

 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =