सकल मराठा समाजाच्या गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना यश, संघर्ष आणि कर्तृत्वाचा मंत्र; गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान
सावंतवाडी | प्रतिनिधी :
“जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रात इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आणि उत्पन्न दोन्ही वाढेल. ‘कामयाब नही, काबिल बनो’… स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल. स्वतःच्या कर्तृत्वाची अशी रेषा आखा जी कोणालाही पुसता येणार नाही,” असे प्रेरणादायी प्रतिपादन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
सकल मराठा समाज, सिंधुदुर्गच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेत तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मराठा समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आमदार निलेश राणे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले की, आज आपण ज्या व्यासपीठावर गुणवंतांचा गौरव करीत आहोत, ते व्यासपीठ सहजासहजी मिळालेले नाही. स्वतःच्या आयुष्यातही मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. अनेक अपयशांनंतर यश मिळाले. त्यामुळे कष्ट, चिकाटी आणि संघर्ष हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. आज व्यासपीठावर उपस्थित असलेली प्रत्येक मान्यवर व्यक्ती संघर्षातूनच या स्थानापर्यंत पोहोचली आहे.
माझ्या आयुष्यातील कठीण काळात ज्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि आधार दिला, त्यामध्ये सीताराम गावडे यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या यशाची दखल घेतली जावी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उदात्त हेतूने ते गेली अनेक वर्षे या गौरव सोहळ्याचे सातत्याने आयोजन करीत आहेत. दहावी आणि बारावीनंतर पुढील शिक्षण व करिअरविषयी योग्य मार्गदर्शन या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी सांगितले.
राणे साहेबांमुळेच जिल्ह्यात उच्च शिक्षणाची गंगा : आ. दीपक केसरकर
यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या मेडिकल कॉलेजमधून पहिली डॉक्टरांची बॅच यशस्वीपणे बाहेर पडली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण केली. आज त्यांचे दोन्ही सुपुत्र आ. निलेश राणे आणि आ. नितेश राणे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी काम करीत आहेत.” मराठा समाजाने आपल्या राजकीय प्रवासात दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
युती सरकारकडून मराठा समाजाला सर्व सवलती : संजू परब
शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सह्याद्री पट्ट्यातील गोरगरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे नेहमी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. तसेच राज्यातील युती सरकारने मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे विविध सवलती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा समाज संघटनेची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
या भव्य सोहळ्यास व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ले सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावंकर, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
